चार हजार शेतक-यांचे सोने सावकारांकडेच
By admin | Published: October 15, 2015 02:37 AM2015-10-15T02:37:44+5:302015-10-16T02:30:44+5:30
कर्जमाफीचे भिजत घोंगडे: कर्जदार शेतक-यांना केव्हा मिळणार लाभ?
अकोला: परवानधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी सहा महिन्यांपूर्वी शासनामार्फत कर्जमाफीची योजना जाहीर करण्यात आली; मात्र या कर्जमाफी योजनेचा लाभ अद्याप जिल्ह्यातील एकाही कर्जदार शेतकर्याला मिळाला नाही. कर्जमाफी योजनेचे घोंगडे भिजतच असल्याने, दसरा-दिवाळीचा सण तोंडावर आला असतानाही जिल्ह्यातील कर्जदार ३ हजार ८८१ शेतकर्यांनी गहाण ठेवलेले सोने परवानाधारक सावकारांकडेच आहे. त्यामुळे सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्यांना केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर विदर्भ आणि मराठवाड्यातील संकटात सापडलेल्या दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यात येत असल्याची घोषणा गतवर्षी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांनी केली होती. यासंबंधी १0 एप्रिल रोजी शासनाच्या सहकार खात्यामार्फत निर्णयदेखील काढण्यात आला. कर्जमाफीच्या निर्णयानुसार जिल्ह्यात १९६ परवानाधारक सावकारांकडून ३ हजार ८८१ कर्जदार शेतकर्यांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत तालुका उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आल्या. दुष्काळग्रस्त शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याच्या योजनेस सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला; मात्र जिल्ह्यातील एकाही कर्जदार शेतकर्याला कर्जमाफीचा लाभ अद्यापपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे कर्जापोटी शेतकर्यांनी जिल्ह्यातील परवानाधारक शेतकर्यांकडे गहाण ठेवलेले सोने अद्याप सावकारांकडेच आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत गहाण ठेवलेले सोने परत मिळेल, अशी कर्जदार शेतकर्यांना आशा होती; मात्र दसरा, दिवाळीचा सण आला तरी, परवानाधारक सावकारांकडे गहाण असलेले सोने जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्यांना अद्यापही परत मिळाले नाही. त्यामुळे कर्ज वाटपापोटी परवानाधारक सावकारांना कर्ज रकमेसह व्याज रकमेचे वितरण केव्हा होणार आणि कर्जदार शेतकर्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्यांना केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.