चोरीचे सोने खरेदी करण्याचा प्रयत्न करणारा सराफा मोकाटच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 01:45 PM2019-03-27T13:45:13+5:302019-03-27T13:45:18+5:30
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला; मात्र सदर सराफा अद्याप मोकाट असून, पोलीस गांधी रोडवरील या सराफाविरुद्ध पुरावे गोळा करीत असल्याची माहिती आहे.
अकोला: रायगड जिल्ह्यातील तीन घरफोड्यांतील चोरी केलेले सोने रायगड जिल्ह्यातीलच चोरटा अकोल्यातील गांधी रोडवरील एका सराफाकडे विक्रीसाठी आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला; मात्र सदर सराफा अद्याप मोकाट असून, पोलीस गांधी रोडवरील या सराफाविरुद्ध पुरावे गोळा करीत असल्याची माहिती आहे. या चोरट्याने सदरचे सोने गांधी रोडवरील एका सराफाला विकण्यासाठी आणल्याची कबुली पोलिसांना दिली होती.
कोकणातील रायगड जिल्ह्यात तीन ठिकाणी मोठ्या चोऱ्या केल्यानंतर प्रसाद जगन्नाथ पाटील नामक २६ वर्षीय चोरटा या तीन चोरीतील सोने विक्री करण्यासाठी गांधी रोडवरील एका सराफाकडे आला होता. तीन चोऱ्यांमध्ये लाखो रुपयांचे सोने चोरी केल्यानंतर अर्ध्या किमतीमध्ये हे सोने खरेदी-विक्रीचा डाव रचण्यात आला; मात्र सदर चोरट्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी चोरट्यावर पाळत ठेवली व त्याला अटक केली होती. त्याची कसून चौकशी करून झाडाझडती घेतली असता या चोरट्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे १६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. त्यानेच हे सोने गांधी रोडवरील एका सराफाकडे विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गांधी रोडवरील या चोरीचे सोने खरेदी करणाºया चोरट्या सराफाचा शोध सुरू केल्याची माहिती आहे.
बाळापुरातील दोन सराफाही सुटले!
बाळापुरातील दोन सराफांना अकोला पोलिसांनी चोरीचे सोने खरेदी-विक्रीच्या संशयावरून ताब्यात घेतले होते; मात्र त्यानंतर सदर सराफांना सोडण्यात आल्याची माहिती आहे. या दोन सराफांना चोरट्याच्या माहितीवरूनच ताब्यात घेतले होते; मात्र दोन दिवस ताब्यात ठेवून या सराफांना सोडण्यात आले होते.