रायगडमधील चोरीचे सोने अकोल्यात विकण्याचा डाव; चोरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 03:50 PM2019-03-06T15:50:10+5:302019-03-06T15:50:10+5:30
रायगड जिल्ह्यातील तीन घरफोड्यातील चोरी केलेले सोने विक्रीसाठी गांधी रोडवर असलेल्या एका अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली.
अकोला: अकोल्यातील सराफा चोरीचे सोने खरेदी करण्यात विदर्भातच नव्हे तर थेट कोकणापर्यंत कुप्रसिद्ध असल्याचे वास्तव मंगळवारी समोर आले असून, रायगड जिल्ह्यातील तीन घरफोड्यातील चोरी केलेले सोने विक्रीसाठी गांधी रोडवर असलेल्या एका अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली. त्याने सदरचे सोने गांधी रोडवरील एका सराफाला विकण्यासाठी आणल्याची कबुली पोलिसांना दिली असून, यावरून लोकमतने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केलेल्या चोरट्या सराफांचे पितळ पुन्हा एकदा उघड झाले आहे.
कोकणातील रायगड जिल्ह्यात तीन ठिकाणी मोठ्या चोऱ्या केल्यानंतर प्रसाद जगन्नाथ पाटील नामक २६ वर्षीय चोरटा या तीन चोरीतील सोने विक्री करण्यासाठी गांधी रोडवरील एका सराफाकडे आला होता. तीन चोऱ्यांमध्ये लाखो रुपयांचे सोने चोरी केल्यानंतर अर्ध्या किमतीमध्ये हे सोने खरेदी-विक्रीचा डाव रचण्यात आला; मात्र सदर चोरट्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी चोरट्यावर पाळत ठेवली. या प्रकाराची कुणकुण सराफालाही लागल्याची माहिती असून, त्यामुळे गांधी रोडवरील या सराफाने सदर चोरट्यास मंगळवारी दुपारपर्यंत या परिसरात थांबवून ठेवले. तेवढ्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सदर चोरटा प्रसाद पाटील यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करून झाडाझडती घेतली असता या चोरट्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे १६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात शेख हसन, अब्दुल मजीद, एजाज अहमद, अशोक चाटी, रवी इरचे यांनी केली.
गांधी रोडवरील तो चोरटा सराफा कोण?
गांधी रोडवर प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या सराफांची प्रतिष्ठाने आहेत; मात्र रायगड जिल्ह्यातून चोरीचे सोने विक्रीसाठी आलेला हा चोरटा गांधी रोडवरील त्या कोणत्या चोरट्या सराफाकडे आला होता, याची चौकशी करण्यात येत आहे; मात्र सोने खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला नसल्याने सदर चोरटा सराफा या प्रकरणातूनही अलगद बाहेर पडल्याची चर्चा आहे.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
चोरट्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने हे सोने सापडल्याची माहिती पोलिसांना दिली; मात्र पोलिसांनी त्यावर विश्वास न ठेवता चोरट्यास पोलीस कारवाईचा धाक दाखवताच त्याने सदर चोरीच्या सोन्याची कबुली देत ते गांधी रोडवरील सराफाकडे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.