सोने आणखी तेजाळणार; वर्षभरात भाव ३२ हजारावर जाण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 02:09 PM2018-03-08T14:09:34+5:302018-03-08T14:09:34+5:30
अकोला : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती आणि लग्न सराईमुळे सोन्याची मागणी वाढत असल्याने चार महिन्यात सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे. आगामी वर्षभरात सोने पुन्हा ३२००० रुपयांच्या पलीकडे जाण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविल्या जात आहे.
अकोला : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती आणि लग्न सराईमुळे सोन्याची मागणी वाढत असल्याने चार महिन्यात सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे. आगामी वर्षभरात सोने पुन्हा ३२००० रुपयांच्या पलीकडे जाण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविल्या जात आहे.
हजार-पाचशे रुपयांच्या नोटबंदीनंतर आणि त्यानंतरच्या जीएसटीनंतर सराफासह सर्वच बाजारपेठेत मंदीचे सावट पसरले होते. त्यामुळे सोन्याचे भाव ३० हजार रुपयांपर्यंत (प्रती १० ग्रॅम) पोहोचले होते. दरम्यान, सणासुदीत तरी बाजारपेठेत तेजी येणार की नाही, यावर शंका उपस्थित केली जात होती. दरम्यान वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या बजेटमधून कोणताही दिलासा सराफांना मिळाला नाही. ३ टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आले. दरम्यान, नीती आयोगात विशेष तरतूद करण्याचे शासनाने जाहीर केले. दरम्यान, नामी सराफा हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहूल चौकसी यांनी पंजाब नॅशनल बँकेला २५ हजार कोटींनी चुना लावला. वार्षिक अर्थसंकल्प आणि बँक घोटाळ््यानंतर शेअर बाजारात मोठे चढ-उतार आले, मात्र बाजारपेठ पुन्हा सावरली गेली. सोन्याच्या दराचा आलेख उंचावत असल्याने सराफा आणि सर्वसामान्य नागरिक सुखावला आहे. दरम्यान, अलीकडे लग्न सराईचे दिवस असल्याने सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढली. त्यामुळे सोन्याचे दीड हजाराने उंचावलेले आहे. सोन्यातील ही झळाळी चालू वर्षात ३२००० रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
असा राहिला सोन्याच्या दराचा आलेख .... प्रति १० ग्रॅम
डिसेंबर २०१७ - ३०२००
जानेवारी २०१८ - ३०७७५
फेब्रुवारी २०१८ - ३१२५०
मार्च २०१८ - ३१३००
सोन्याच्या दराचा आलेख या वर्षी कायम चढतीवर राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. ३२००० रुपयांपर्यंत हे भाव जाऊ शकतात. सोन्याला झळाळी मिळत असल्याने बाजारपेठेतील मंदीचे सावट दूर होत आहे.
- प्रकाश लोढिया, सराफा व्यावसायिक, अकोला.