आशियाई पदकविजेत्या श्लोकची स्वर्णिम कामगिरी
By admin | Published: January 7, 2017 10:14 PM2017-01-07T22:14:50+5:302017-01-07T22:14:50+5:30
ग्रॅण्डमास्टर होण्याचे स्वप्न बघणारा चिमुकला श्लोक चांदराणीने लोकमत स्पोर्ट फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजविला
Next
>चांदराणी भावंडं चमकले बुद्धिबळ खेळात
नीलिमा शिंगणे-जगड, ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. ७ - ग्रॅण्डमास्टर होण्याचे स्वप्न बघणारा चिमुकला श्लोक चांदराणीने लोकमत स्पोर्ट फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजविला. वयाच्या पाचव्या वर्षी २०१२ ला दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या श्लोकने स्वर्णिम कामगिरी केली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा गाजविणारा दहा वर्षीय श्लोक शनिवारी इयत्ता १ ते ४ गटात विजेता ठरला. श्लोकची मोठी बहीण फोरम राष्ट्रीय बुद्धिबळपटू हिनेदेखील इयत्ता ७ ते १० मुलींच्या गटात विजेतेपद पटकाविले. चांदराणी भावंडं आज स्व. प्रभादेवी नारे क्रीडानगरीत कौतुकाचा विषय ठरली.
श्लोकने वयाच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्याने आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत त्याने द्वितीय स्थान मिळवून, अकोला जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकविले. दरवर्षी राष्ट्रीय स्पर्धा गाजवित त्याने फिडे मानांकनही प्राप्त केले. एवढ्या कमी वयात इंटरनॅशनल रेटिंग प्लेअर म्हणूनही त्याने नावलौकिक मिळविला. वयाच्या सातव्या वर्षी श्लोकने मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत तृतीय स्थान मिळविले होते. कोलकतामधील राष्ट्रीय स्पर्धाही गाजविली. आॅगस्ट २०१६ मध्ये श्लोकने जालंधर (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. श्लोकने आपली मोठी बहीण राष्ट्रीय बुद्धिबळपटू फोरम हिच्यासोबत बुद्धिबळ खेळता-खेळता लहान वयातच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू म्हणून गौरव मिळविला.
. सध्या दोघेही प्रशिक्षक प्रवीण हेंड यांच्याकडे नियमित सहा ते सात तास बुद्धिबळाचा सराव करतात.लोकमत स्पोर्ट फेस्टिव्हलबद्दल बोलताना, अशाप्रकारचा क्रीडा महोत्सव सातत्याने घेतल्यास निश्चितच छोट्या शहरातून अनेक आंतररराष्ट्रीय खेळाडू तयार होतील, असे जयेश चांदराणी यांनी सांगितले.