गावे हगणदारीमुक्त करण्यासाठी ‘गुड माॅर्निंग ’ पथके सुरु करणार !
By संतोष येलकर | Published: April 18, 2023 06:47 PM2023-04-18T18:47:28+5:302023-04-18T18:47:48+5:30
मात्र जिल्हयातील काही गावांमध्ये शौचालयाचा वापर न करता, उघड्यावर शौचास केली जात आहे.
अकोला : जिल्हयात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुध्द कारवाइ करुन, गावे हगणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा, तालुका व गावस्तरावर ‘गुड माॅर्निंग ’ पथके सुरु करण्याचा ठराव जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत मंगळवारी मंजूर करण्यात आला. त्यानुसार जिल्हयातील गावे हगणदारीमुक्त करण्यासाठी ‘गुड माॅर्निग ’ पथके सुरु करण्यात येणार आहेत.जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने जिल्हयातील ग्रामीण भागात गावे हगणदारीमुक्त करण्यासाठी पायाभूत सर्वेक्षणानुसार शौचालयांचे बांधकाम करण्यात आले; मात्र जिल्हयातील काही गावांमध्ये शौचालयाचा वापर न करता, उघड्यावर शौचास केली जात आहे.
त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे वास्तव जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनिल फाटकर यांनी सभेत मांडून उघड्यावर शौचास बसरणाऱ्यांवर कारवाइ करण्यासाठी आणि गावे हगणदारीमुक्त करण्याकरिता जिल्हयात ‘गुड माॅर्निंग ’ पथके सुरु करण्याचा ठराव मांडला. त्यानुसार जिल्हयात गावे हगणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा, तालुका व गाव पातळीवर ‘गुड माॅर्निंग ’ पथके सुरु करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.
जिल्हयातील पाणीटंचाइच्या मुद्दयावरही या सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला उपाध्यक्ष सुनिल फाटकर, समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे, समिती सदस्य मीना बावणे, जगन्नाथ निचळ, संजय अढाऊ, मीरा पाचपोर , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाणीटंचाइच्या प्रश्नाकडे सभापतींनी वेधले लक्ष !
तापत्या उन्हासोबतच जिल्हयातील विविध भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाइच्या प्रश्नाकडे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती आम्रपाली खंडारे सभागृहाचे लक्ष वेधले. बाळापूर तालुक्यासह जिल्हयातील अनेक गावांमध्ये महिलांना हंडाभर पाण्यासाठी तीन किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाइ समस्येचा सामना करताना अनेक महिलांना रोजगारास मुकावे लागते. त्यामुळे पाणीटंचाइ संदर्भातील ग्रामस्थांच्या वेदना समजून उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही सभापती आम्रपाली खंडारे यांनी सभेत सांगीतले.
गैरहजर अधिकाऱ्यांना ‘शो काॅज’ बजावणार
सभेला काही संबंधित अधिकारी गैरहजर असल्याच्या मुद्दयावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानुषंगाने परवानगी न घेता, सभेला गैरहजर राहिलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा ( शो काॅज) नोटीस बजावण्याचे निर्देश सभेत देण्यात आले.