अकोलेकरांसाठी शुभ वार्ता... एकही बाधीत नाही; १८ पैकी १६ रुग्ण ‘निगेटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:01 AM2020-03-25T11:01:58+5:302020-03-25T15:38:44+5:30
१८ रुग्णांपैकी १६ रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.
अकोला : कोरोनाच्या संशयावरून सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या १८ रुग्णांपैकी १६ रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. दोन रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. अकोलेकरांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी ‘होम क्वारंटीन’ केलेल्या रुग्णांनी आणि सोशल डिस्टन्सींगसाठी लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन झाल्यास कोरोनाचे भीषण संकट अकोलेकरांवर कोसळणार आहे. सर्वोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या दोन संशयित रुग्णांपैकी एका रुग्णावर आयसोलेशन कक्षात, तर दुसऱ्या रुग्णाला अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत विदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे अशा संशयित रुग्णांनाच आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते; परंतु आता संसर्गातूनही आजारी पडणाºया रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी एकही नवीन रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाला नाही; मात्र सध्या जिल्हाभरातील विविध गावांमध्ये मुंबई, पुणे व इतर महानगरांमधून आलेल्या रुग्णांपैकी अनेकांना ‘होम क्वारंटीन’ केले आहे. त्यांनी कुणाशीही संपर्क करू नये, अशा सूचना आहेत. दरम्यान, बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी तपासणी करावी तसेच कोणीही आपल्याकडे आलेला पाहुणा लपवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.