Good News : ९३ कोरोना संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 11:09 AM2020-05-16T11:09:51+5:302020-05-16T11:11:05+5:30
शनिवारी ९३ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्व निगेटिव्ह आले आहेत.
अकोला : मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच प्रचंड वेग घेतलेल्या कोरोना संसर्गाला शनिवार, १६ मे रोजी प्रथमच ‘ब्रेक’ लागला असून, तब्बल ९३ संदिग्ध रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची दिलासादायक बातमी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. शनिवारी ९३ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. ही दिलासादायक बाब असली, तरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २१८ वर असल्याने आणि आणखी १०१ रुग्ण आयसोलेशन कक्षात दाखल असल्याने धोका टळलेला नाही.
पश्चिम विदर्भात सर्वाधिक कोरोना रुग्ण अकोल्यात असून, नागपूरनंतर विदर्भात अकोल्याचा दुसरा क्रमांक लागतो. सहा एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या अकोल्यात दीड महिन्यातच दोनशेचा टप्पा ओलांडून कोरोनाबाधितांची संख्या १५ मे पर्यंत २१८ वर गेली असून, मृतकांचा आकडाही १६ झाला आहे. या पृष्ठभूमीवर शनिवार, १ मे रोजी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेकडून ९३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यामधील सर्वच अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. आणखी काही अहवाल प्रलंबित असल्याने सायंकाळच्या अहवालाकडे अकोलेकरांचे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आतापर्यंत एकूण २१८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गुरुवार व शुक्रवारी आणखी दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या १६ झाली आहे. दरम्यान, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूचा आकडा हा १७ असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. आतापर्यंत एकूण १०० जणांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षात १०१ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडू देण्यात आली.
आज प्राप्त अहवालाची स्थिती
प्राप्त अहवाल-९३
पॉझिटीव्ह-शून्य
निगेटीव्ह-९३
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- २१८
मयत-१७(१६+१), डिस्चार्ज- १००
दाखल रुग्ण(अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- १०१