जलयुक्तची चाैकशी सुडभावनेतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:51 AM2020-12-04T04:51:19+5:302020-12-04T04:51:19+5:30
हे सरकार बदली व बदला घेणारे अकाेला : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये स्वारस्य ठेवणारे असून, ...
हे सरकार बदली व बदला घेणारे
अकाेला : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये स्वारस्य ठेवणारे असून, या सरकारच्या विराेधात बाेलणाऱ्यांची मुस्कटदाबी करून विराेधाचा बदला घेणारे सरकार आहे, असा आराेप करून जलयुक्त शिवार याेजनेची चाैकशी करण्याचा घाट हा सूड भावनेतून घेतला असल्याचे भाजपा आमदार निलय नाईक यांनी स्पष्ट केले
राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी भाजपाच्यावतिने बुधवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने केवळ देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयांना स्टे देण्याचीच भूमिका घेतली आहे, तर काही निर्णयांची चाैकशी करून स्वत:च्या सरकारची अकार्यक्षमता दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले. शेतकरी हवालदिल झाला. त्यांना मदत मिळत नाही. सरकारविराेधात बाेलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे, त्यामुळे हे सरकार अकार्यक्षम आहे. आज घेतलेला निर्णय उद्या बदलविणे एवढेच या सरकारचे काम असल्याचा टाेलाही त्यांनी हाणला, यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापाैर अर्चना मसने, तेजराव थाेरात, गिरिश जाेशी आदी उपस्थित हाेते.
बाॅक्स
अन नाईक निरुत्तर झाले
अकाेल्यातील सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटलमध्ये या सरकारने वर्ग १ ते ४ कर्मचाऱ्यांची ४०० पदे मंजूर असून, या सरकारने सदर पदे भरण्यास मंजुरी दिली नाही, असा आराेप आ. नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला, यावर नाईक यांना हे सुपर स्पेशालीटी हाॅस्पिटल भाजपच्याच कार्यकाळात तयार झाले; पण तत्कालीन सरकारने पदांना मंजुरी दिली नाही, त्यामुळे भाजपाचे अपयश नाही का, अशी विचारणा नाईक यांना केली असता, ते निरूत्तर झाले अन् सारवासारव करत वेळ मारून नेली.