गोपीकिशन बाजोरियांसह तीन उमेदवारांनी घेतले ११ अर्ज
By admin | Published: December 4, 2015 03:03 AM2015-12-04T03:03:06+5:302015-12-04T03:03:06+5:30
विधान परिषद निवडणूक ीसाठी दुस-या दिवशीही उमेदवारी दाखल नाही
अकोला: अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशीही (गुरुवारी) एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसून, आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह तीन उमेदवारांनी ११ अर्ज घेतले. अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जांचे वितरण व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २ डिसेंबरपासून अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात सुरू झाली. ९ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशी गुरुवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवसही कोरा ठरला. दरम्यान, गुरुवारी शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकृष्ण अंधारे यांनी तीन आणि बुलडाणा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र सपकाळ यांनी चार असे एकूण तीन उमेदवारांनी ११ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहातून घेतले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उ पजिल्हाधिकारी (निवडणूक) उदय राजपूत, तहसीलदार पुरी उपस्थित होते.