शेतात अंत्यविधीच्या वादावरून गोरेगावात तणाव
By admin | Published: December 31, 2014 12:52 AM2014-12-31T00:52:56+5:302014-12-31T00:52:56+5:30
पोलीस बंदोबस्तात पार पडला अंत्यविधी.
गोरेगाव खुर्द (अकोला): येथील एका शेतात मृतकाचा अंत्यविधी करण्यावरून मंगळवारी गोरेगावात तणाव निर्माण झाला. शेतमालकाने सदर जागेत अंत्यविधी करण्यास नकार दिल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. अखेर तहसीलदार व पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून गावकर्यांची व शेतमालकाची समजूत काढून हा वाद तात्पुरता निकाली काढला.
अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द येथील जी. टी. वाकोडे यांच्या गावालगतच्या शेतातील एका कोपर्यात गत काही वर्षांपासून गावातील एका समाजातील मृतकांचा अंत्यविधी केला जातो. याला वाकोडे यांनी आजपर्यंत हरकत घेतली नव्हती. परंतु काही दिवसांपूर्वीच त्यांनी शेताला तारेचे कुंपण घेतले. दरम्यान, मंगळवारी गावातील शेवंताबाई तायडे यांचा मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी कुटुंबीयांनी मृतदेह स्मशानभूमीत आणला; परंतु तेथे तारेचे कुंपण असल्यामुळे त्यांनी मृतदेह तेथेच ठेवला. गत अनेक वर्षांपासून या जागेवर अंत्यविधी केला जात असल्यामुळे आजही तेथेच अंत्यविधी करू द्यावा, अशी भूमिका मृतकाचे कुटुंबीय व इतरांनी घेतली; परंतु या जागेवर स्मशानभूमी असल्याची कोणतीही नोंद नसल्याचे सांगत वाकोडे यांनी तसे करू देण्यास हरकत घेतली.
शेवटी हा वाद विकोपास गेल्यानंतर माजी उपसरपंच सारंग तायडे यांनी ही बाब बाळापूर पोलिसांना कळविली. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे ठाणेदार घनश्याम पाटील पोलीस ताफ्यासह गावात दाखल झाले. हा सर्व प्रकार दुपारी १२ ते सायंकाळी ४.३0 पर्यंत सुरू होता. अखेर अकोल्याचे तहसीलदार संतोष शिंदे, ठाणेदार पाटील, जे. टी. वाकोडे, सुनील तायडे, संजय तायडे, सारंग तायडे, पोलीस पाटील दिलीप वाकोडे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष संतोष वाकोडे आदींनी ग्रामपंचायत भवनात चर्चा करून हा वाद सामोपचाराने मिटविण्याचे ठरविले. यानंतर शेताचे एका भागाकडील तीन फुटांचे कुंपण काढण्यात आले आणि मृतदेह शेतात नेऊन तेथे अंत्यविधी करण्यात आला.
दरम्यान, गावातील शांतता भंग होऊ नये म्हणून ठाणेदार पाटील यांनी कमांडो दलाचे ३0 जवान व बाळापूरचे पोलीस कर्मचारी बोलावले होते. यावेळी तहसीलदारांनी स्मशानभूमीच्या वादावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.