‘स्थायी’च्या आढावा बैठकीत प्रशासनाचा फ्लॉप शो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:46 AM2017-11-10T01:46:20+5:302017-11-10T01:46:38+5:30
अकोला : नगरसेवकांनी वारंवार सूचना करूनही प्रभागातील समस्या निकाली काढल्या जात नाहीत. क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांसह विविध विभाग प्रमुख व अतिक्रमण अधिकार्यांच्या बेताल कारभारामुळे डोक्याचा भुगा होण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नगरसेवकांनी वारंवार सूचना करूनही प्रभागातील समस्या निकाली काढल्या जात नाहीत. क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांसह विविध विभाग प्रमुख व अतिक्रमण अधिकार्यांच्या बेताल कारभारामुळे डोक्याचा भुगा होण्याची वेळ आली आहे. नागरिकांचा रोष वाढत असल्याने तुमच्याकडून कामे होत नसतील, तर तसे स्पष्ट करा, असे सांगत स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी मनपा अधिकार्यांची खरडपट्टी काढली. गुरुवारी स्थायी समितीच्या आढावा बैठकीत नगरसेवकांनी विचारलेल्या बहुतांश प्रश्नांचे निराकरण करण्यात मनपाचे अधिकारी ‘फ्लॉप’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
महापालिकेची स्थायी समिती असो वा सर्वसाधारण सभा, यामध्ये प्रभागातील समस्यांचा पाढा वाचणार्या नगरसेवकांच्या पदरी निराशाच आल्याची परिस्थिती आहे. बोटावर मोजता येणारे दोन चार प्रभावी नगरसेवक व पदाधिकार्यांच्या प्रभागात मनपाची यंत्रणा सक्रिय असून, उर्वरित प्रभागांमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी गुरुवारी उपायुक्त, लेखाधिकारी तसेच सर्व विभाग प्रमुख, उपअभियंत्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन केले. यापूर्वी स्थायी समितीने घेतलेल्या कोणकोणत्या निर्णयांवर अंमलबजावणी झाली, याचा आढावा घेण्यात आला असता संबंधित विभाग प्रमुखांसह उपायुक्त समाधानकारक खुलासा करू शकले नाहीत. नगरसेवकांच्या समस्या निकाली काढण्यात मनपाची यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असल्याचे चित्र यानिमित्ताने समोर आले. बैठकीला बाळ टाले, सुमनताई गावंडे, नगरसेवक सुनील क्षीरसागर, अजय शर्मा, विजय इंगळे, अमोल गोगे, दिलीप मिश्रा, फैयाज खान, नौशाद अहमद, पराग कांबळे, मोहम्मद मुस्तफा, सिद्धार्थ उपर्वट, उपायुक्त समाधान सोळंके, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, सहा. आयुक्त जीतकुमार शेजव तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.