शासनच करतेय हरित लवादाच्या आदेशाची अवहेलना!
By admin | Published: May 8, 2017 02:51 AM2017-05-08T02:51:28+5:302017-05-08T02:51:28+5:30
अन्न व औषधी प्रशासनाने उघड्यावर जाळला दोन ट्रक गुटखा.
अकोला : देशभरातील रस्त्यावर, उघड्या ठिकाणी कचरा जाळण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) निर्बंध लावले असून, डिसेंबर २0१६ मध्ये यासंबंधीचा आदेश दिला; परंतु शासनाकडूनच हरित लवादाच्या आदेशाची सर्रास पायमल्ली होताना दिसून येत आहे. हरित लवादाच्या आदेशानंतरही शासनानेसुद्धा उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी घातली असताना, शासनाचा एक विभाग असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांनी चक्क उघड्यावर दोन ट्रक गुटखा उघड्यावर जाळून शहराच्या प्रदूषणात भरच घातली आहे. त्यामुळे शासन अन्न व औषध प्रशासनावर दंडात्मक कारवाई करेल का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडून घनकचरा व्यवस्थापन नियमांचे सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारांना लवादाने पीव्हीसी आणि क्लोरिनेटेड प्लास्टिकवर सहा महिन्यांमध्ये बंदी घालण्याचा आदेश दिला आहे; परंतु या आदेशाकडे शासन दुर्लक्ष करीत असून, कायद्याचा भंग करण्याचा सपाटाच शासनाच्या अधिकार्यांनी लावला आहे. शनिवारी अन्न व औषध प्रशासनाने जिल्हय़ातील कारवायांमधील जप्त केलेला १ कोटी ६८ लाखांचा दोन ट्रक गुटखा, सुगंधीत तंबाखू खडकी परिसरात उघड्यावर जाळून हरित लवादाच्या आदेशाची अवहेलना करून शहराच्या वाढत्या प्रदूषणात भर घातली आहे. गुटख्याची विक्री करण्यासाठी सर्रास प्लास्टिक पाकिटांचा वापर केला जातो, तसेच विविध प्रकारची रासायनिक प्रक्रिया करून गुटखा तयार केला जातो. शरीरासाठी अत्यंत घातक आणि पर्यावरणास हानिकारक असलेल्या प्लास्टिक पाकिटातील गुटखा जाळून अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केला. अन्न व औषध प्रशासनाने जाळलेल्या गुटख्यामुळे खडकी परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले.हे प्रदूषण नागरिकांसाठी हानिकारक आहे. गुटखा न जाळता, त्याची जमिनीमध्ये पुरूनसुद्धा विल्हेवाट लावता आली असती; परंतु अन्न व औषध प्रशासनाने उघड्यावर गुटखा जाळून कायद्याचा भंग केल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
मोठय़ा प्रमाणात झाले प्रदूषण
इस शहर को ये हुआ क्या, कहीं राख है तो कहीं धुंवा-धुंवा..अशी चित्रपटाच्या सुरुवातीला लागणारी ही जाहिरातीतील वाक्ये आता अन्न व औषध प्रशासनाने गुटखा जाळून केलेल्या हवा प्रदूषणासाठी वापरावीत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शनिवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनाने दोन ट्रकमध्ये गुटख्याची व तंबाखूची पाकिटे भरून खडकी परिसरात आणले. येथील एका नाल्यामध्ये त्यांनी गुटखा जाळला. गुटखा जाळल्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण झाले. परिसरात आजूबाजूला अनेक घरे होती. त्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात गुटख्याचा धूर आणि वातावरणात वेगळीच दुर्गंधी पसरली होती.
शासनाच्या नियमांनुसार आम्हाला जप्त केलेला गुटखा, तंबाखू जाळूनच नष्ट करावा लागतो. दुसरा पर्यायच नाही, त्यामुळे आम्ही शहराबाहेर दोन ट्रक गुटखा नेऊन खडकी परिसरात जाळला. प्रदूषण होऊ नये, असा आमचा उद्देश आहे. गुटखा जाळल्यामुळे कोणतेही प्रदूषण झाले नाही.
-नितीन नवलकार, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन.
गुटखा जाळल्यामुळे निश्चित वातावरणात प्रदूषण पसरते. गुटखा पॅकिंगसाठी मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचा वापर होता. रासायनिक प्रक्रियासुद्धा होते. गुटख्यापासून निर्माण होणारे प्रदूषण मानवी आरोग्यास हानिकारक आहे. गुटखा जाळण्याऐवजी तो जमिनीत पुरून नष्ट करायला हवा, तसेच गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ पाण्यात मिसळल्यास जलचरांवर त्याचा परिणाम होतो.
-उदय वझे,पर्यावरण अभ्यासक.