कॅनरा बँकेलाही जिल्हाधिकाऱ्यांचा दणका ; शाखांमधील शासकीय खाते बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 02:25 PM2018-06-16T14:25:24+5:302018-06-16T14:25:24+5:30
अकोला : शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात पातूर येथील कॅनरा बँक शाखेची नकारात्मक भूमिका आढळून आल्याने, कॅनरा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधील शासकीय खाते बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिला.
अकोला : शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात पातूर येथील कॅनरा बँक शाखेची नकारात्मक भूमिका आढळून आल्याने, कॅनरा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधील शासकीय खाते बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी दिला. त्यामुळे पीक कर्ज वाटपात टाळाटाळ करणाऱ्या अॅक्सीस बँक पाठोपाठ कॅनरा बँकेलाही जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येत असून, पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बँकांना दिले आहेत; मात्र काही बँकांकडून पीक कर्ज वाटपाचे काम संथगतीने सुरू आहे, तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवार, १५ जून रोजी पातूरचे तहसीलदार डॉ.रामेश्वर पुरी यांच्यासोबत पातूर येथील कनरा बँकेच्या शाखेला भेट दिली असता, बँक शाखेतील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी शेतकºयांना पीक कर्ज वाटपाच्या कामात हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून, शेतकºयांना पीक कर्ज वाटपाच्या योजनेपासून वंचित ठेवत असल्याचे आढळून आले, तसेच पीक कर्जासाठी पात्र असलेल्या खातेदार शेतकºयांना कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगून, पीक कर्ज वाटपाची जबाबदारी टाळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पीक कर्ज वाटपात नकारात्मक भूमिका असल्याचे दिसून येत असल्याने, कॅनरा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधील शासकीय खाते बंद करून, या बँकेच्या शाखांचे शासकीय खाते जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे उत्कृष्ट काम करणाºया बँकेत उघडण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिला. पीक कर्ज वाटपात टाळाटाळ करणाऱ्या अॅक्सीस बँकमधील ४५ कोटींच्या शासकीय ठेवी काढून घेण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी गत सोमवारी दिला होता. त्यापाठोपाठ पीक कर्ज वाटपात नकारात्मक भूमिका घेणाऱ्या कॅनरा बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधील शासकीय खाते बंद करण्याचा दणका जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १५ जून रोजी दिला.