गरिबांच्या धान्यावर शासनाने लावला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:22 AM2017-07-31T02:22:16+5:302017-07-31T02:22:16+5:30
मूर्तिजापूर : गोरगरीब जनतेला सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून शिधापत्रिकेवरील धान्याचा केला जाणारा पुरवठा केंद्र व राज्य शासनाने बंद केल्याने मजूर व सर्वसामान्य नागरिकांना जगणे बिकट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : गोरगरीब जनतेला सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून शिधापत्रिकेवरील धान्याचा केला जाणारा पुरवठा केंद्र व राज्य शासनाने बंद केल्याने मजूर व सर्वसामान्य नागरिकांना जगणे बिकट झाले आहे. कारण सध्या कामधंदे नसल्याने मजुरी मिळविणे दुरापास्त झाले आहे. आता स्वस्त धान्य मिळणे बंद झाल्याने गरिबांची कोंडी झाली आहे. त्यांना आता महागडे धान्य विकत घेऊन उपजीविका भागविण्याची वेळ आली आहे.
गरिबांना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून शिधापत्रिकेवर धान्य उपलब्ध करून देण्याचे शासनाचे ध्येयधोरण आहे; मात्र शासनाने गरिबांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून त्यांचे अन्न हिरावून घेतल्याने जनतेत शासनाप्रती नाराजीचा सूर उमटत आहे. केंद्र व राज्य शासनाने पूर्वी सन २०१४ पासून केसरी शिधापत्रिकाधारकांचे धान्य व केरोसीन बंद केले. त्यानंतर जुलै २०१७ पासून ‘बीपीएल’वरील साखरेचे वाटप बंद करण्यात आले. एवढेच नव्हे, तर मागील चार महिन्यांपासून ‘बीपीएल’वरील तांदूळ वाटप बंद झाले. केंद्र व राज्य शासनाने केरोसीनचा कोटा वाढवून देण्याऐवजी कमी केला आहे. त्यामुळे एका सिलिंडरधारकास मिळणारे रॉकेलही पूर्णपणे बंद झाले आहे. एखादेवेळी कोणाच्या घरात कुणाचे निधन झाल्यास त्या व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी रॉकेल मिळणे सध्याच्या घडीला रॉकेल आवश्यक ठरते; पण रॉकेलचा तुटवडा असल्याने त्याने अंत्यविधी कसा पूर्ण करावा, असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.