जलजगृतीसाठी शासनाचा पुढाकार!

By admin | Published: March 3, 2016 02:02 AM2016-03-03T02:02:48+5:302016-03-03T02:02:48+5:30

जलसंपदा विभागाद्वारे १६ ते २२ मार्च दरम्यान राज्यात जलजागृती सप्ताह.

Government initiatives for water conservation! | जलजगृतीसाठी शासनाचा पुढाकार!

जलजगृतीसाठी शासनाचा पुढाकार!

Next

अकोला : शेतकरी,नागरिकामध्ये राज्यभरात जलजागृती करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. कृषी, पाणीपुरवठा, उद्योग, पर्यावरण, ग्रामविकास व नगरविकास आदी विभागांमार्फत जलजागृतीसाठी आठवडाभर विविध उपकम, प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविले जाणार आहेत. राज्यातील एकात्मिक पाणी नियोजन, सिंचन प्रकल्पांची उभारणी आणि व्यवस्थापनाची महत्वाची जबाबदारी जलसंपदा विभागावर असल्याने या विभागाला जल जन जागृतीवर भर द्यावा लागणार आहे.
राज्यात १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील वर्षी किमान १0 टक्के सिंचन कार्यक्षमता वाढविण्याचे उद्दीष्ट जलसंपदा विभागाला देण्यात आले आहे. यासाठी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस स्वत: या उपक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या सप्ताहाबाबत सर्वच स्तरावर जोमाने तयारी सुरू आहे. प्रत्येक जिल्हयात संबधित विभाग जोमाने कामाला लागले आहेत. जलसंपदा विभागातंर्गत बांधकाम, सिंचन व्यवस्थापन, सर्वेक्षण, संकल्पन, संशोधन या कार्यप्रकारातील कार्यालये, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) नाशिक, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी (मेटा) नाशिक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) औरंगाबाद, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे, इत्यादी संस्था हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यासाठी विविध समित्याही तयार करण्यात आल्या आहेत.
या सप्ताहात पूर्ण झालेल्या प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापन, बांधकामाधीन प्रकल्पाबाबत जनजागृती करण्यात येईल. सिंचन कायदे, कोल्हापुरी बंधार्‍यांना दरवाजे बसवणे, भूसंपादन, पुनर्वसन, लाभधारकांच्या अडचणी, लाभ क्षेत्रातील प्रत्येक गावात, तालुका ठिकाणी, जिल्हास्तरावर लाभधारक, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी- कर्मचार्‍यांच्या सभा, बैठका, मेळावे, व्याख्यानांचे आयोजन केले जाणार आहे. पाण्याचे महत्व, शासनाचे उपक्रम, पाणी बचतीबाबत उपाय, आधुनिक सिंचन पध्दती याबाबतची घोषवाक्ये, माहितीदर्शक चित्रफीती, फलक अशा विविध माध्यमातून या सप्ताहात जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणीदरम्यान शासनस्तरावरू न मार्गदर्शन व समन्वय राखण्यासाठी डॉ. संजय बेलसरे, स. को. सब्बीनवार, अधिक्षक अभियंता व उपसचिव, हे नोडल अधिकारी म्हणून काम बघणार आहेत.

Web Title: Government initiatives for water conservation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.