शासनाचा २0 कोटींचा भूखंड हडपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:56 AM2017-08-02T02:56:17+5:302017-08-02T02:56:57+5:30

अकोला : संतोषी माता मंदिर परिसरातील  शासनाच्या मालकीचा तब्बल ४0 हजार स्क्वेअर फुटाचा (एक एकर) भूखंड बनावट दस्तावेज तयार करून कागदोपत्री हडपल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

Government loses 20 crores plot! | शासनाचा २0 कोटींचा भूखंड हडपला!

शासनाचा २0 कोटींचा भूखंड हडपला!

Next
ठळक मुद्दे‘पैकी’ शब्द टाकून केली हेराफेरी बनावट दस्तावेज केले तयारसिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार 

सचिन राऊत । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : संतोषी माता मंदिर परिसरातील  शासनाच्या मालकीचा तब्बल ४0 हजार स्क्वेअर फुटाचा (एक एकर) भूखंड बनावट दस्तावेज तयार करून कागदोपत्री हडपल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. २0 कोटी किमतीच्या या भूखंडाचे कोणतेही हस्तलिखीत दस्तावेज नसताना तालुका भूमि अभिलेख कार्यालयातील तत्कालीन अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संगनमताने या भूखंडाची संगणकीकृत नोंद करून बनावट दस्तावेज तयार करण्यात आले असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. या प्रकरणाची सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
अकोला शहरातील सीट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व सिटी नं. ३७ बी १२१/१ अ हे. संतोषी माता मंदिराच्या पाठीमागील भागात (माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर) भला मोठा भूखंड शासनाच्या नावे असून, या भूखंडातील सीट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/पैकी  असा शब्दप्रयोग करून तब्बल ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर म्हणजेच तब्बल ४0 हजार स्क्वेअर फूट भूखंडाची तालुका भूमि अभिलेख कार्यालयामध्ये संगणकीकृत खोटी नोंद घेण्यात आली आहे. या भूखंडाचे कोणतेही दस्तावेज गजराज गुदडमल  मारवाडी नामक इसमाच्या नावावर नसताना भूमि अभिलेख कार्यालयात मात्र संगणकीकृत नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर अशाच प्रकारच्या बनावट दस्तावेजाद्वारे खोटे मालमत्ता पत्रकही तयार करण्यात आले असून, हा ४0 हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड बनावट दस्तावेज व नोंदीद्वारे गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे करण्यात आला आहे. 
सीट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ तसेच १२१/१ अ हे शासनाचेच असून, याच भूखंडावर ‘पैकी’ अशा शब्दाचा खेळ करून तब्बल ४0 हजार स्क्वेअर फुटाचा हा भूखंड तालुका भूमि अभिलेख कार्यालयात गजराज मारवाडी यांच्या नावे नोंद करून हडपण्यात आला आहे. त्यानंतर या जागेचे फेरफार व अन्य दस्तावेजही बनावट तयार करून त्याची विक्री करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत; मात्र या प्रकरणाची तक्रार अमर डिकाव यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली असल्याने हा घोटाळा करणार्‍यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पोलिसांनीही याप्रकरणी भूमि अभिलेख कार्यालयाला अहवाल मागितला असून, त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२६ कोटी रुपयांमध्ये सौदा?
या भूखंडाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार जोरात सुरू आहे. तब्बल २६ कोटी रुपयांमध्ये हा भूखंड विक्री करण्याच्या हालचाली सुरू असून, यामध्ये शहरातील एक मोठा व्यापारी असल्याची माहिती आहे. सदर व्यापार्‍याचे एक मोठे प्रतिष्ठान याच परिसरात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

माहिती अधिकारात माहितीच नाही!
या प्रकरणाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर डिकाव यांनी भूमि अभिलेख कार्यालयात मागितली असता, सदर भूखंडाचे दस्तावेज कार्यालयात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. हक्क नोंदणीसाठी या भूखंडाचे दस्तावेज नक्कल अर्जाद्वारे मागण्यात आले; मात्र भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक यांनी सदर भूखंडाचे नोंदणीचे दस्तावेजच नसल्याची माहिती दिली आहे.

बाजारमूल्य २0 कोटींच्या घरात
संतोषी माता मंदिरामागे असलेल्या या भूखंडाचे बाजारमूल्य तब्बल ५ ते ६ हजार रुपये स्क्वेअर फूट असल्याची माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. तर या भूखंडाचा शासकीय दर ८00 ते ९00 रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे बाजारमूल्यानुसार या भूखंडाची किंमत तब्बल २0 कोटी रुपयांच्यावर असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

 मी नव्यानेच म्हणजेच ११ जुलै रोजी प्रभार घेतला असल्याने सदर प्रकरणाची माहिती घेत आहे. सिटी कोतवाली पोलिसांनी यासंदर्भात अहवाल मागविला असून, सदर अहवाल पोलिसांना सादर करण्यात आला आहे. यापुढेही या प्रकरणासंदर्भात संपूर्ण सहकार्य करणार असून, दस्तावेजही पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर भूखंड गजराज मारवाडी यांच्या नावे असल्याची नोंद भूमि अभिलेख कार्यालयात आहे. ही नोंद २0१५ मध्ये झाली असल्याची माहिती आहे.
- योगेश कुळकर्णी
उपअधीक्षक, भूमि अभिलेख कार्यालय, अकोला.

या भूखंड प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार संबंधित विभागाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. कोणतेही कागदपत्रे नसताना मालमत्तापत्रक बनविण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. हा प्रकार भूमि अभिलेख कार्यालयातील कोणत्या अधिकार्‍यांच्या कालावधीत झाला, याची चौकशी करण्यात येत आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
- अनिल जुमळे, ठाणेदार सिटी कोतवाली, अकोला. 
 

Web Title: Government loses 20 crores plot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.