शासकीय रोपवाटिका तोट्यात; ज्यूटचे आठ हेक्टरमध्ये केवळ दीड क्विंटल उत्पादन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:53+5:302021-05-22T04:17:53+5:30
संजय उमक मूर्तिजापूर : येथील सिरसो परिसरात २५ हेक्टर क्षेत्रावर असलेल्या कृषी अधिकारी कनिष्ठ, कृषी चिकित्सालय रोपवाटिका असून, गत ...
संजय उमक
मूर्तिजापूर : येथील सिरसो परिसरात २५ हेक्टर क्षेत्रावर असलेल्या कृषी अधिकारी कनिष्ठ, कृषी चिकित्सालय रोपवाटिका असून, गत अनेक वर्षांपासून प्रचंड तोट्यात येत असल्याने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यंदा ८ हेक्टर क्षेत्रात ज्युटचे लागवड केली होती, यामध्ये केवळ दीडच क्विंटल उत्पादन झाल्याने लागवडीचा खर्चही निघाला नसल्याची माहिती आहे.
गतवर्षी या क्षेत्रात तुरीचा इतर वाणाचा पेरा करण्यात आला होता; मात्र उत्पादन नाममात्र आल्याने गतवर्षीही रोपवाटिका प्रचंड तोट्यात आली. यावर्षी ८ हेक्टर क्षेत्रात ज्यूट लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या कृषी चिकित्सालयाला केवळ दीड क्विंटल ज्यूटचे उत्पादन झाले. या रोपवाटिकेत कृषी अधिकाऱ्यासह चार कर्मचारी असून व अनेक मजूर काम करतात कर्मचाऱ्यांवर महिन्यांसाठी तीन लक्ष रुपये खर्च केला जातो; अर्थात वर्षभरात ३६ लाख खर्च होत असून, उत्पन्न मात्र नाममात्र होत असल्याने 'चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला' अशी स्थिती या रोपवाटिकेची झाली आहे. ८ हेक्टरमध्ये केवळ ७ हजारांचे ज्यूटचे उत्पन्न झाले, तर फळ रोपवाटिकेतून मातृवृक्ष प्रमाणात १२.९६ लक्ष रुपये उत्पन्न झाल्याची व २ हेक्टर क्षेत्र पडीक असल्याची माहिती आहे. तरी सुध्दा वर्षभरात या रोपवाटिकेच्या माध्यमातून शासनाला प्रचंड तोटा सहन करावा लागत असल्याने कृषी चिकित्सेच्या नावाखाली लाखोंची उधळपट्टी होत आहे.
---------------------
२५.१७ हेक्टरवर आहे रोपवाटिका
शेतकऱ्यांना अनुदानावर फळ बागेसाठी या रोपवाटिकेतून अनुदान तत्त्वावर फळरोपे पुरविली जातात. २५.१७ हेक्टर क्षेत्र असलेल्या रोपवाटिकेत केवळ १२ हेक्टर क्षेत्रात रोपांचे उत्पन्न घेतले जाते, तर ८ हेक्टर क्षेत्रावर इतर खरीप व रब्बी तूर, मूग, सोयाबीन, हरभरा, ज्यूट या पिकांचे उत्पादन घेतल्या जाते. आश्चर्य म्हणजे एवढे मोठे जमीन क्षेत्र असताना यात उत्पादन घेण्यासाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उदासीनता दिसून येते.
---------------
वेळेवर खरीप रब्बी लागवडीसाठी निधी उपलब्ध होत नाही, पदरमोड करून पेरणी करावी लागते. वेळेवर फवारणी व पिकांची आंतर मशागत होत नाही त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होते. तरीही रोपवाटिका नफ्यात आणण्याचा आमचा प्रयत्न असतो.
-मंजूषा नाळे
कृषी अधिकारी, कृषी चिकित्सालय, (सिरसो) मूर्तिजापूर