कायद्यात बदलासाठी सरकार सकारात्मक - गिरीश व्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 02:00 PM2019-06-24T14:00:23+5:302019-06-24T14:00:34+5:30
व्यापाऱ्यांसोबत समाजाच्या हिताचे निर्णय घेतले जात आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य गिरीश व्यास यांनी केले.
अकोला : कोणतेही कायदे बदलण्यासाठी नवे मुद्दे पाहिजे असतात, त्यासाठी सर्वांगीण अभ्यास महत्त्वाचा आहे. कायद्यात बदल करताना फायदे-तोटे, सामाजिक परिणाम विचारात घेऊन तसे बदल करावे लागतात. सरकार सकारात्मक स्वरूपात बदल करीत आहे. व्यापाऱ्यांसोबत समाजाच्या हिताचे निर्णय घेतले जात आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य गिरीश व्यास यांनी केले. रविवारी सकाळी खंडेलवाल भवनात विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सची ८५ वी आमसभा पार पडली. या सभेत प्रमुख अतिथी म्हणून आमदार गिरीश व्यास बोलत होते. याप्रसंगी मंचावर अकोला महापालिकेचे महापौर विजय अग्रवाल, चेंबरचे अकोला जिल्हाध्यक्ष राजकुमार बिलाला, नितीन खंडेलवाल, राहुल मित्तल, निकेश गुप्ता, विजय पनपालिया व किशोर बाछुका हे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्समध्ये महत्त्वपूर्ण आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्याचा आढावा घेत स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी महापौर विजय अग्रवाल त्यांच्या भाषणातून व्यापाºयांचे आभार व्यक्त करीत महापालिका भविष्यात कोणत्या विकासात्मक योजना राबविणार आहे, त्याची माहिती दिली. सूत्रसंचालन विवेक डालमिया यांनी केले.
आभार राहुल मित्तल यांनी मानले. आमसभेच्या निमित्ताने व्यापारी मेळावा येथे झाला. त्यात मल्टी काम्युडीटी एक्सचेंजच्या तज्ज्ञांनी व्यापारासंदर्भात माहिती दिली. सोबतच अकोल्यातील सुप्रसिद्ध कर सल्लागार अॅड. धनंजय पाटील यांनी जीएसटीवर मार्गदर्शन केले. आमसभेला विविध क्षेत्रातील शेकडो व्यापारी-उद्योजक प्रामुख्याने उपस्थित होते.
विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या आमसभेच्या निमित्ताने अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते; मात्र दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीमुळे ते या कार्यक्रमास हजर राहू शकले नाही; मात्र त्यांचा उल्लेख येथे सर्वच मान्यवरांनी केला.
वेबसाइट, मोबाइल अॅपचा लोकार्पण सोहळा
१९३३ मध्ये ब्रजलालजी बियाणी यांनी स्थापन केलेल्या चेंबरने हायटेक होत वेबसाइटचे आणि मोबाइल अॅप तयार केले आहे. त्याचेही लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले. यामध्ये १५०० नामांकित व्यापाºयांची ९९ उद्योगांची यामध्ये संपूर्ण माहिती आहे.