शासकीय खरेदी बंद, हरभऱ्याचे भाव पडले; चार दिवसांत २०० रुपयांची घसरण
By रवी दामोदर | Published: April 25, 2023 02:29 PM2023-04-25T14:29:53+5:302023-04-25T14:30:10+5:30
शेतकऱ्यांची लूट सुरूच
अकोला : हरभरा खरेदीसाठी असलेले नाफेडचे जिल्हा पोर्टल बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील खरेदी केंद्रांना टाळे लागले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे फावले असल्याचे चित्र आहे. बाजार समितीत गत चार-पाच दिवसांत क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव पडले आहेत. त्यामुळे हे षड्यंत्र असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. गत चार दिवसांपूर्वी ४ हजार ७०० रूपये प्रति क्विंटल असलेला हरभरा मंगळवार, दि.२५ एप्रिल रोजी ४ हजार ५५० प्रति क्विंटल विक्री झाला.
केंद्र शासनाने हरभऱ्यासाठी यंदा ५,३३५ रूपये क्विंटल हमीभाव जाहीर केला. प्रत्यक्षात खासगीमध्ये हा भाव मिळत नसल्याने नाफेडद्वारे केंद्रांकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला. खरेदी सुरू झाल्यापासून नाफेडद्वारा साधारणपणे चार लाख क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. नाफेडद्वारे जिल्ह्यातील एकूण हरभरा उत्पादनाच्या २५ टक्के हरभरा खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाल्याने आता खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना खासगीमध्ये हरभरा विक्री करण्याशिवाय पर्याय उरला नाही. यामध्ये दर पडल्याने आता शेतकऱ्यांची लूट होत आहे.
उत्पादन खर्च निघणे कठीण, शेतकरी हतबल
गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे रब्बीवरच या सर्व शेतकऱ्यांची मदार होती. मात्र, हरभऱ्याला सुरुवातीपासूनच भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च पदरी पडणार की नाही, अशी शक्यता शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.
नाफेड खरेदी सुरू होणार का?
हरभरा खरेदी पुन्हा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावर बैठका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये वाढीव टार्गेट देण्यात येऊन नोंदणी केलेला शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात अद्याप कुठल्याही सूचना जिल्हास्तरावर नसून, जिल्हास्तरावरूनही उद्दिष्ट वाढवून घेण्यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी दिवसांत नाफेड सुरू होणार की नाही, यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. परंतु नाफेड खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक फटका बसत आहे.