‘विदर्भ पॅकेज’साठी पाचही जिल्ह्यातून प्रस्ताव शासनाकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 02:12 PM2018-07-20T14:12:38+5:302018-07-20T14:14:22+5:30

अकोला : शासनामार्फत प्रस्तावित असलेल्या विदर्भ आणि मराठवाडा पॅकेजसाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून उपाययोजनांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले.

 Government proposal for Vidarbha Package from 5 districts | ‘विदर्भ पॅकेज’साठी पाचही जिल्ह्यातून प्रस्ताव शासनाकडे!

‘विदर्भ पॅकेज’साठी पाचही जिल्ह्यातून प्रस्ताव शासनाकडे!

googlenewsNext
ठळक मुद्देविदर्भ पॅकेजमध्ये करावयाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले होते. प्रस्तावांमध्ये पाचही जिल्ह्यातून २३१ कोटी ५० लाख रुपयांच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. सोलर व इलेक्ट्रीक पंप देण्यासाठी १० कोटी रुपयांची उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली.

- संतोष येलकर

अकोला : शासनामार्फत प्रस्तावित असलेल्या विदर्भ आणि मराठवाडा पॅकेजसाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातून उपाययोजनांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले. त्यामध्ये पाचही जिल्ह्यात २३१ कोटी ५० लाख रुपयांच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
विदर्भ व मराठवाड्याचा जलदगतीने विकास व्हावा, यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांचे ‘पॅकेज’ शासनामार्फत प्रस्तावित आहे. तयार करण्यात येत असलेल्या विदर्भ पॅकेजमध्ये करावयाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले होते. त्यानुसार अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यातून, करावयाच्या उपाययोजना आणि त्यासाठी अपेक्षित निधीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आले. जिल्हानिहाय सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये पाचही जिल्ह्यातून २३१ कोटी ५० लाख रुपयांच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, त्यामध्ये विविध योजना आणि उपक्रमांच्या उपाययोजनांचा समावेश आहे.


जिल्हानिहाय उपाययोजनांचे असे आहेत प्रस्ताव!
-अकोला जिल्हा : शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देणे आणि शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी ‘वावर’ योजना राबविणे. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत जैविक खते व कीटकनाशक केंद्रांचे बळकटीकरण करणे.
-अकोला -बुलडाणा जिल्हा : दोन्ही जिल्ह्यातील शासनाच्या रोपवाटिकांमध्ये प्रत्येकी दोन रोपवाटिका स्थापन करणे.
-अमरावती जिल्हा : शेतकºयांचे उत्पादन वाढीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या महाबीजसोबत लिंक करून शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून बियाणे विकत घेणे. जिल्ह्यात सात रोपवाटिका स्थापन करणे. कृषीपूरक उद्योग विकसित करणे व मधसंकलन केंद्र विकसित करणे.
-बुलडाणा जिल्हा : शिमला मिरची व टोमॅटो बियाणे वाढीसाठी शेडनेट हाउसची उपाययोजना करणे. शेगाव-मलकापूर भागातील खारपाणपट्टा विकासाकरिता डायलिसीस युनिट सुरू करणे. सिंदखेड येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे. सफेद मुसळी उत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना करणे.
वाशिम जिल्हा : कृषीपूरक उद्योगासाठी जागा उपलब्ध करणे. व्यावसायिक कुक्कुटपालन योजना राबविणे.
यवतमाळ जिल्हा : महिला बचत गटाद्वारे महिला कृषी सेवा केंद्र स्थापन करून कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखणे व कमी किमतीत निविष्ठा उपलब्ध करून देणे. कृषी अवजारे केंद्र उभारणे व कुक्कुटपालन योजना राबविणे. हळद प्रक्रिया केंद्र, मत्स्य खाद्य युनिट सुरू करणे, टॉक्सॉलॉजी सेंटर निर्माण करणे, रोहयो अंतर्गत पाणंद रस्ते कामाच्या धोरणात सुधारणा करणे आणि वाघाडी नदीच्या काठावरील गावांमध्ये वृक्ष लागवड करणे.

पर्यटन, विकास आराखड्याचे असे आहेत प्रस्ताव!
अमरावती विभागातील पर्यटन विकासाच्या प्रस्तावात लोणार पर्यटन विकास, मेळघाट पर्यटन विकास, मोझरी विकास आराखडा, कौडण्यपूर विकास आराखडा, वलगाव विकास आराखडा आणि पोहरादेवी स्थळ विकास आराखडा इत्यादी विकासाचे प्रस्ताव अपेक्षित निधी मागणीसह शासनाकडे सादर करण्यात आले.

पाचही जिल्ह्यात शेततळ्यांना अस्तरीकरण, कुंपन, गोदामाची योजना प्रस्तावित !
प्रस्तावित विदर्भ पॅकेजमध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात शेततळ्यांना अस्तरीकरणासाठी २५ कोटी रुपयांची उपाययोजना, वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी दहा शेतकऱ्यांना एकत्रित करुन शेतांना चेनलिंक कुंपन घेण्याची १ कोटी रुपयांची योजना आणि शेतमाल साठवणुकीसाठी पाचही जिल्ह्यात लहान गोदाम तयार करण्यासह सिंचनासाठी शेतकºयांना सोलर व इलेक्ट्रीक पंप देण्यासाठी १० कोटी रुपयांची उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली.

 

Web Title:  Government proposal for Vidarbha Package from 5 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.