शासनाच्या महसूल विभागामार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचा आदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 02:44 AM2017-12-08T02:44:05+5:302017-12-08T02:46:15+5:30
अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकर्यांना नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत गुरुवारी राज्यातील जिल्हाधिकार्यांना देण्यात आला. त्यानुषंगाने अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ांत कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे.
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकर्यांना नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत गुरुवारी राज्यातील जिल्हाधिकार्यांना देण्यात आला. त्यानुषंगाने अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ांत कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्हय़ांत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने धान पिकाचेही नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने कपाशी व धान पिकाचे नुकसान झालेल्या बाधित शेतकर्यांना पीक नुकसान भपाईची मदत देण्याची मागणी होत आहे. या पृष्ठभूमीवर बाधित शेतकर्यांना मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचा निर्णय ५ डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुषंगाने बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे आणि तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावाने धान पिकाच्या नुकसानाचे दहा दिवसांत पंचनामे करण्याचा आदेश शासनाचे उपसचिव सु. ह. उमराणीकर यांनी ७ डिसेंबर रोजी राज्यातील विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकार्यांना दिला आहे. शासन आदेशानुसार अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्हय़ांत जिल्हा प्रशासनामार्फत कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
अकोला जिल्ह्यातील पंचनामे सोमवारपासून!
जिल्ह्यात कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्याच्या मुद्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकार्यांची बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील राजस्व, कृषी व संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर सोमवार, ११ डिसेंबरपासून जिल्ह्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे.