शासन महसूल विभागाच्या पाठीशी- रणजित पाटील
By admin | Published: February 2, 2015 01:46 AM2015-02-02T01:46:14+5:302015-02-02T01:46:14+5:30
अकोल्यात तहसीलदार संघटनेचे विभागीय अधिवेशन.
अकोला : शासनाचा कणा असलेल्या महसूल विभागाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहणार आहे, अशी ग्वाही राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे दिली. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या अमरावती विभागीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे, वाशिमचे जिल्हाधिकारी आर. जी. कुळकर्णी, अमरावतीचे उपजिल्हाधिकारी अजय लहाने, अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुरेश बगळे, विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकरे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे उपस्थित होते. डॉ. पाटील पुढे म्हणाले की, महसूल विभाग महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो. त्यामधील सर्वांनाच कालबद्ध पदोन्नती मिळाली पाहिजे. त्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यास चालना दिली जाईल. शेतकर्यांना मदतवाटप करण्याची जबाबदारी पार पाडणार्या महसूल विभागांतर्गत प्रत्येक तहसील कार्यालयस्तरावर एक साहाय्यक लेखाधिकारी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. सर्वसामान्य माणसांपर्यंत योजना पोहचविण्याचे काम करणार्या महसूल विभागाच्या पाठीशी शासन उभे राहणार असून, महसूल अधिकार्यांवर पोलीस कारवाई किंवा त्यांची चौकशी करताना संबंधित विभागप्रमुखांना विचारात घेतले पाहिजे, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.