शासनाने तूर खरेदी करावी; अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2017 02:00 AM2017-07-08T02:00:04+5:302017-07-08T02:00:04+5:30
भारिप-बमसं, शेतकरी जनआंदोलन कृती समितीचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप त्वरित व्हावे, या मागणीसाठी ७ जुलै रोजी भारिप-बमसं कार्यकर्ते सुभाष रौंदळे, जीवन बोदडे, अशोक दारोकार, प्रदीप तेलगोटे, प्रा. संजय हिवराळे, रमेश दारोकार यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तेल्हारा तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. शासनाने तुरीची खरेदी व मोजमाप त्वरित करावे; अन्यथा भारिप-बमसं तेल्हारा तालुका व शेतकरी जनआंदोलन कृषी समिती तेल्हारा तालुकाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
शासनाच्या १६ मे २०१७ च्या निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार ३१ मे पावेतो ज्या शेतकऱ्यांकडे तूर विक्री बाकी आहे, अशांनी ३१ मे पावेतो बाजार समिती कार्यालयात नाव नोंदणी अर्ज व कागदपत्रे सादर करावी. त्यानंतर बाजार समितीत तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना मोजमापाकरिता क्रमवारीसंदर्भात शेतकऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून बोलावून, अशा शेतकऱ्यांना मोजमापानुसार टोकन वितरित करेल, असे कळविण्यात आले होते. त्यासंदर्भात तेल्हारा बाजार समितीकडे ३१ मे पावेतो २,७४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. पाच वाहनांसह तसेच ७५ शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात १२५० क्विंटल पोत्यांच्या गंजीसह तूूर माल विक्रीसाठी ठेवला आहे. त्यापैकी बाजार समितीने ८५ शेतकऱ्यांना टोकन वितरित केले. त्या ८५ टोकनपैकी खविसं व नाफेड यांनी १ जून रोजी ३८ शेतकऱ्यांना टोकन दिले. परंतु, दीड महिन्यचिंा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप ४५ दिवसांपासून बंद आहे. मोजमापाच्या कामात दिरंगाई करणारे कर्मचारी दोषी असतील, तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच तत्काळ चुकारे करण्यात यावेत, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, जिल्हा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी अकोला, डीएमओ जिल्हा मार्केट फेडरेशन अकोला, उपविभागीय अधिकारी अकोट, सहायक निबंधक तेल्हारा यांना पाठविण्यात आल्या आहेत.