शासनाने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी
By admin | Published: October 25, 2016 02:10 AM2016-10-25T02:10:14+5:302016-10-25T02:10:14+5:30
प्रकाश आंबेडकर यांनी केला त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार.
वाशिम, दि. २४- मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे काढण्यास सुरुवात केल्यानंतर शासनाने त्याचवेळी चर्चा घडवून आणली असती तर यावर उपाय निघाला असता. मागण्यांसाठी मोर्चे काढण्यावर बंधन घालता येत नाही. शासनाने आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, याचा पुनरुच्चार भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आले असता त्यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले की, सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढल्यानंतर राज्यातील अँट्रासिटी कायदा रद्द करण्याची मागणी पुढे रेटली. त्यामुळे दलितांनीसुद्धा मोर्चा काढण्यास सुरुवात केली. परिणामी पूर्वी समाजा-समाजामध्ये जो बंधुभाव होता; त्याला आता तडा तर जाणार नाही ना? अशी चिंता वाटत आहे. समान नागरी कायदा हा हिंदूंसाठी असून मुस्लिमांना याची गरज नाही. अनेक समाज व जाती हिंदू धर्मात मोडत असल्यामुळे हिंदूंना सुद्धा समान नागरी कायदा लागू होईल का? असा प्रश्न आपणास पडला असल्याचेही आबेडकर म्हणाले. प्रत्येक धर्माला त्याचा प्रसार व प्रचार करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.