राज्यात शासकीय तूर खरेदी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 11:28 AM2021-03-18T11:28:07+5:302021-03-18T11:30:03+5:30
Government tuar procurement stalled तुरीची खुल्या बाजारात विक्री होत असून, नाफेडच्या हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली.
अकोला : हमीभावाने तूर खरेदीसाठी शासनाने ६ हजार रुपये दर ठरविला; मात्र बाजारात ६ हजार १०० ते ६ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. परिणामी, तुरीची खुल्या बाजारात विक्री होत असून, नाफेडच्या हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. राज्यात हमीभावाने केवळ १ हजार १४४ शेतकऱ्यांकडून १ हजार २३७ क्विंटल खरेदी झाल्याचे नाफेडच्या अहवालातून समोर आले आहे.
केंद्र सरकारने देशातील अन्नधान्य उत्पादनाचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा तूर उत्पादन ३.८८ दशलक्ष टन राहील असे म्हटले आहे. मागील वर्षी ३.८९ दशलक्ष टन उत्पादन होते. यंदा किंचित घट होईल असे जाहीर केले; मात्र यंदा बाजारात तुरीचे दर वाढत आहे. अवकाळीचा फटका पिकाला बसला. त्यानुसार देशातील उत्पादन सरकारच्या आकड्यापेक्षा ही कमी राहील अशी शक्यता आहे. त्यातच नाफेडच्या माध्यमातून हमीभावाने राज्यात तूर खरेदी सुरू केली. तूर उत्पादकांना हमीभाव केंद्रापेक्षा बाजारात जास्त भाव मिळाला. याचा परिणाम नाफेडच्या तूर खरेदीवर दिसून आला. यावर्षी नाफेडच्या तूर खरेदीत मोठी घट झाली. राज्यात नाफेडने महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, महा फार्मर प्रोड्यूसर कंपनी व महाराष्ट्र पृथशक्तीच्या माध्यमातून केवळ १ हजार २३७ क्विंटल खरेदी केली आहे. बहुतांश जिल्ह्यात तूर खरेदी शून्य झाली असून मोबाईलवर संदेश पाठवून सुद्धा शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.
अशी आहे नाफेडची खरेदी
महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन
७८७.०४५ क्विंटल
विदर्भ मार्केटिंग फेडरेशन
३९७.२१३ क्विंटल
महा फार्मर प्रोड्यूसर कंपनी
३३.६५० क्विंटल
महाराष्ट्र पृथशक्ती
१९.९०० क्विंटल
अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक खरेदी
राज्यात बहुतांश जिल्ह्यात शून्य खरेदी झाली आहे; मात्र अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक ७४९ क्विंटल तूर खरेदी झाली. तर यवतमाळ जिल्ह्यात २३५ क्विंटल तूर खरेदी झाली.