जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य!
By admin | Published: August 17, 2015 01:23 AM2015-08-17T01:23:58+5:302015-08-17T01:23:58+5:30
अकोला येथील स्वातंत्र्य दिन समारंभात पालकमंत्र्यांची ग्वाही.
अकोला: जिल्हा शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात भरीव प्रगती करीत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार आहे, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित जिल्ह्याच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्यासह स्वातंत्र्य संग्राम सैनिक, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात निवडण्यात आलेल्या २00 गावांमध्ये करण्यात आलेल्या कामांची दखल घेऊन शासनामार्फत समाधान व्यक्त केले आहे. अतवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरवडून गेलेल्या जमिनीसह पीक नुकसानाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. सन २0१४-१५ या वर्षात शेतकर्यांच्या अल्पमुदती कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. तसेच विहित मुदतीत कर्ज हप्ता भरणार्या शेतकर्यांच्या कर्जावरील एक वर्षाचे व्याज माफ करण्यात आले असून, पुढील चार वर्षात कर्जावर सहा टक्के दराने व्याज आकारणी करण्यात येणार असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष दिले जणार असून, महत्त्वपूर्ण काम तडीस नेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असेही पालकमंत्री डॉ.पाटील यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन कार्यक्रम समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले.