१ तारखेला वेतन अदा करण्याचा शासन निर्णय; मात्र अंमलबजावणीकडे दुर्लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:39 PM2019-10-06T12:39:36+5:302019-10-06T12:39:42+5:30
शिक्षण विभागाकडून शासनाच्या निर्णयाला हरताळ फासला जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शिक्षक महासंघाने केला आहे.
अकोला: राज्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला नियमित वेतन अदा करण्याचा आदेश शासनाने वेळोवेळी दिला आहे; परंतु शिक्षण विभागाकडून शासनाच्या निर्णयाला हरताळ फासला जात असल्याचा आरोप जिल्ह्यातील शिक्षक महासंघाने केला आहे. तसेच खासगी शिक्षक संघटना, विमाशिसं, विज्युक्टाने यंदा दिवाळीपूर्वी तरी शिक्षकांना वेतन द्यावे, अशी शिक्षण उपसंचालकांकडे शुक्रवारी मागणी केली आहे.
जिल्ह्यातील वेतन पथक अधीक्षक शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता, त्यांच्या पद्धतीने वेतन देयके अदा करतात. असे असले तरी त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. शासन निर्णयानुसार १ तारखेला वेतन अदा करणे अपेक्षित असताना, वेतन पथक अधीक्षकांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. शासन निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन नियमित वेळेवर मिळण्यासाठी पाचही जिल्ह्यांतील वेतन पथक अधीक्षकांना आदेश द्यावा, शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता माहे आॅक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी व तसेच दर महिन्याचे वेतन १ तारखेला अदा न केल्यास संबंधित वेतन पथक अधीक्षक यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांच्यासह शिक्षक संघटनांनी केली आहे. अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे केली आहे. (प्रतिनिधी)