सरकारचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखलेले - रविकांत तुपकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 02:39 PM2019-01-08T14:39:43+5:302019-01-08T14:39:48+5:30
जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय होणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. आता हे आंदोलन राजकीयच अर्थात या भाजपा शासनाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.
मूर्तिजापूर: शेतकरी हिताची एकही गोष्ट या शासनाने केली नसून, सरकारच शेतकरी आत्महत्येस जबाबदार आहे. खऱ्या अर्थाने सरकारचे हात शेतकऱ्यांच्या रक्ताने माखलेले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, हमी भाव दिला तरी या देशातला शेतकरी सुखी होईल, शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय झाला पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्न राजकीय होणार नाही, तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत. आता हे आंदोलन राजकीयच अर्थात या भाजपा शासनाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. ७ जानेवारी रोजी मूर्तिजापूर तहसील कार्यालयासमोर शेतकºयांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.
भाजपा सरकारकारचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, मोदींना रात्रीचा नाद आहे. ते कुठली घोषणा रात्रीच करतात. ती नोटबंदी असो की जीएसटी, फुलतांब्याचा निर्णय असो. भाजपाला लेकरं नवसाने झाले असल्याची टीका करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या भाषणाची एक झलक उपस्थित शेतकºयांना ऐकवली. राम मंदिर नाही बांधले तर इथला शेतकरी मरणार नाही; पण शेतकºयांप्रती उदासीन धोरणाचा निषेध करीत सरकारने शेतकºयांना नक्षलवादाच्या दिशेने घेऊन जाऊ नये, असा सज्जड दमही भरला. आमची आंदोलने गांधीजींच्या मार्गाने चालू आहेत. जर भगतसिंगाच्या रूपात आलो तर शासनाला पळता भुई थोडी होईल, असा इशाराही शासनाला दिला. शेतकºयांच्या प्रश्नावर शेतकºयांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले. विचारवंत डॉ. श्रीकांत तिडके यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शेकापचे विजय गावंडे, प्रगती शेतकरी मंचाचे राजू वानखडे, भारतीय किसान संघाचे राहुल राठी, श्रावण रणबावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आंदोलनाचे संयोजक अरुण बोंडे यांच्यासह न्यू यंग क्लब फार्मर्स, प्रगती शेतकरी मंच, भारतीय किसान संघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, जनमंच या सर्व संघटना धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुधाकर गौरखेडे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)