ग्रा.पं. निवडणूक : उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे अहवालच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:21 AM2018-01-20T01:21:43+5:302018-01-20T01:22:03+5:30
जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर केवळ दोन तालुक्यांतील निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, पाच तालुक्यांतील निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांचे अहवाल अद्यापही तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही.
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर ३0 दिवसांत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे; मात्र गत ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर केवळ दोन तालुक्यांतील निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले असून, पाच तालुक्यांतील निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांचे अहवाल अद्यापही तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही.
जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गत ७ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले व निवडणुकांचे निकाल ९ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरपंच पदांसाठी ८९६ आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी २ हजार ७५५ अशा एकूण ३ हजार ६५१ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालानंतर ३0 दिवसांच्या कालावधीत उमेदवारांनी निवडणूक खर्च संबंधित तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुषंगाने विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना देण्यात आला होता. त्यामध्ये पातूर व मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर न करणार्या उमेदवारांचे अहवाल संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आले असून, जिल्ह्यातील उर्वरित पाच तालुक्यांतील ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या मात्र निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांचे अहवाल अद्यापही संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आले नाही.
‘या’ तालुक्यातील प्रलंबित आहेत अहवाल
ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या मात्र निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांचे पाच तालुक्यांतील अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यामध्ये अकोला, अकोट, तेल्हारा, बाश्रीटाकळी व बाळापूर या पाच तालुक्यांतील निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांचे अहवाल संबंधित कार्यालयामार्फत जिल्हाधिकार्यांकडे अद्याप सादर करण्यात आले नाही.
मूर्तिजापुरातील उमेदवारांची २ फेब्रुवारीला सुनावणी!
ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च विहित मुदतीत सादर न करणार्या पातूर व मूर्तिजापूर तालुक्यातील उमेदवारांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाकडे सादर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने मूर्तिजापूर तालुक्यातील निवडणूक खर्च सादर न करणार्या उमेदवारांची सुनावणी २ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे.
-