घंटागाडीवर ‘जीपीएस’ प्रणाली
By admin | Published: April 21, 2017 02:02 AM2017-04-21T02:02:49+5:302017-04-21T02:02:49+5:30
मनपाकडे पाच निविदा प्राप्त: उद्या उघडणार
अकोला : नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने खरेदी केलेल्या १२५ वाहनांवर मनपाच्या वतीने ‘जीपीएस’ प्रणाली लावल्या जाणार आहे. यासाठी प्रशासनाकडे विविध पाच कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या असून, शनिवारी निविदा उघडल्या जातील.
शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्याच्या उद्देशातून महापालिकेने नागरिक, व्यावसायिकांच्या दारात जाऊन कचरा जमा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ८१ व दुसऱ्या टप्प्यात ४४ अशा एकूण १२५ नवीन वाहनांची खरेदी केली. सदर वाहनांवर स्वयंरोजगार तत्त्वावर खासगी चालकांची नियुक्ती केली. संबंधित वाहनचालकांना ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळखल्या जाते. नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याची साठवणूक अपेक्षित असताना काही वाहनचालक शहराच्या कानाकोपऱ्यात तसेच खुली जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा फेकून मोकळे होतात. यामुळे शहराचे व पर्यायाने शहरवासीयांचे स्वास्थ्य धोक्यात सापडण्याची शक्यता आहे. वाहनचालकांच्या कार्यप्रणालीवर देखरेख ठेवण्यासाठी संबंधित वाहनांवर ‘जीपीएस’ प्रणाली लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यासाठी तीन वेळा निविदा प्रकाशित करण्यात आली. निविदा स्वीकारण्याच्या अखेरच्या दिवसपर्यंत मनपाकडे पाच कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. कंपन्यांमधील स्पर्धा पाहता कमी दराची निविदा सादर करणाऱ्या कंपनीची निवड केली जाईल. शनिवारी निविदा उघडल्या जाण्याची शक्यता आहे.