मंगल कार्यालयातून चोरीस गेलेले दागिने हस्तगत!
By admin | Published: July 18, 2016 02:16 AM2016-07-18T02:16:06+5:302016-07-18T02:16:06+5:30
साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरणा-या दोन अट्टल चोरट्यांना रामदासपेठ पोलिसांनी रविवारी जेरबंद केले.
अकोला - ओसवाल भवनमध्ये असलेल्या एका विवाह सोहळय़ातील सुमारे साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरणार्या दोन अट्टल चोरट्यांना रामदासपेठ पोलिसांनी रविवारी जेरबंद केले. या दोघांकडून सुमारे सोडतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, या प्रकरणातील एक अट्टल चोरटा अद्यापही फरार आहे.
जुने शहरातील रहिवासी संदीप दिवेकर यांच्या चुलत भावाचे ओसवाल भवन येथे १३ जुलै रोजी लग्न होते. त्यामुळे मुलीकडील मंडळी व मुलाकडील मंडळी दाग-दागिने घेऊन ओसवाल भवन येथे आले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून ऐवज लंपास केला होता. यामध्ये पाच सोन्याच्या अंगठय़ा २५ ग्रॅम किंमत ५0 हजार रुपये, दोन सोन्याचे गोप २0 ग्रॅम किंमत ३0 हजार रुपये, सोन्याचा चपळा हार ३0 ग्रॅम किंमत ६0 हजार रुपये, सोन्याचा राणी हार १५ ग्रॅम किंमत ३0 हजार रुपये, सोन्याचे नेकलेस दहा ग्रॅम किंमत २0 हजार रुपये, सोन्याचे कानातले पाच ग्रॅम किंमत दहा हजार रुपये यासह नगदी ८३ हजार, असा एकूण ३ लाख २१ हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. हा ऐवज चोरी गेल्यानंतर संदीप दिवेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला. घटनेनंतर तीन दिवसांच्या आतच पोलिसांनी या चोरीचा छडा लावला. इराणी झोपडपट्टीतील गुलाम हसन औलाद हसन, खोलेश्वरमधील करण दशरथ वाघमारे या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे. मात्र रोख रक्कम या दोन अट्टल चोरट्यांचा तिसर्या साथीदाराकडे असल्याची माहिती आहे.