भाषा व गणितात १ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना ए ग्रेड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:45 PM2018-12-11T13:45:32+5:302018-12-11T13:45:47+5:30
जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयामध्ये ए ग्रेड प्राप्त केला तर १ लाख ७४ हजार ६२४ विद्यार्थ्यांना बी ग्रेड प्राप्त केला आहे.
अकोला: प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिकणारे विद्यार्थी १00 टक्के प्रगत झाले पाहिजेत, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत कृती कार्यक्रम चार टप्प्यांमध्ये राबविण्यात आला. चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील ९७५ प्राथमिक शाळांचा अध्ययन स्तर उंचावला आहे. ३ लाख ६७ हजार ५५ विद्यार्थ्यांनी संकलित चाचणी दिली होती. यात जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयामध्ये ए ग्रेड प्राप्त केला तर १ लाख ७४ हजार ६२४ विद्यार्थ्यांना बी ग्रेड प्राप्त केला आहे.
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव, समाधान डुकरे, सागर तुपे, तेजस्विनी आळवेकर, डॉ. राम सोनारे, डॉ. विकास गावंडे, कविता बोरसे, डॉ. जितेंद्र काठोळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा भाषा व गणित विषयातील अध्ययन स्तर ठरविण्यासाठी चार टप्प्यात इयत्ता पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कृती कार्यक्रमादरम्यान सात तालुके व एक मनपा क्षेत्रातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर गटशिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती यांनी निश्चित केला, तसेच जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांनीसुद्धा प्रत्येकी एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयाचा अध्ययन स्तर निश्चित करून त्याचा अहवाल तयार केला. जिल्ह्यातील ९७५ शाळांमधील विद्यार्थ्यांचा भाषेमध्ये ५४.७८ टक्क्यावरून ६५.७३ टक्क्यांवर अध्ययन स्तर उंचावला तर गणित विषयातील वजाबाकीमध्ये ५७.९६ टक्क्यांवरून ६७.९८ टक्के, भागामध्ये ५९.९६ टक्क्यांवरून ६९.५८ टक्क्यांपर्यंत अध्ययन स्तर उंचावला आहे. संकलित चाचणीदरम्यान विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावत असल्याचे दिसून येत आहे. भाषेमध्ये ६६ हजार ४९८ तर गणितात ६१,९७४ विद्यार्थ्यांनी ८१-१00 टक्केपर्यंतचे गुण प्राप्त केले आहेत. (प्रतिनिधी)
ग्रेडनुसार विद्यार्थी संख्या
ए ग्रेड ८१-१00 टक्के- ६६४९८ (भाषा)- ६१९७४ (गणित)
बी ग्रेड ६१-८0 टक्के- ८६३४५- ८८२७९
सी ग्रेड ४१-६0 टक्के- २२३0१- २४0४६
डी ग्रेड 0-४0 टक्के- ५१६५- ६९६५