पदवीधर मतदारसंघ निवडणूक : अकोला जिल्ह्यात १२ वाजेपर्यंत १४ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2023 01:20 PM2023-01-30T13:20:55+5:302023-01-30T13:23:23+5:30
Graduate Constituency Election: : जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रांवर १४.६५ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
अकाेला : विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (३० जानेवारी) जिल्ह्यातील ६१ केंद्रांवर मतदानास शांततेत सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रांवर १४.६५ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत ५० हजार ६०६ मतदार मतदानाचा हक्क बजावून २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करणार आहेत. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून, ६४६ अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले.
जिल्ह्यात ५० हजार ६०६ मतदार असून, दुपारी १२ वाजेपर्यंत यापैकी ७४१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये ५३७४ पुरुष व २०३९ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान कोठेही शांतता भंग होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फिरते पथकही मतदान केंद्रांवर वाॅच ठेवत आहेत. या निवडणुका निर्भय, शांततेत व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.