महाप्रसादासाठी ११ बैलगाड्यांद्वारे केले जाते धान्य गोळा
By admin | Published: January 5, 2017 02:11 AM2017-01-05T02:11:41+5:302017-01-05T02:11:41+5:30
संग्रामपूर तालुक्यातील माहेर-सासर उत्सवाची शतकाची परंपरा.
वानखेड (जि. बुलडाणा), दि. ४- संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील जगदंबा देवस्थानाने देवीच्या माहेर-सासर उत्सवानिमित्त महाप्रसादाची आगळी अशी परंपरा जोपासली आहे. याअंतर्गत परिसरातील गावांमधून ११ बैलगाड्यांमधून धान्य गोळा केले जात असून, गोळा झालेल्या धान्यांचा १३ जानेवारी रोजी महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे.
वानखेड येथील जगदंबा देवीच्या यात्रोत्सवास १0 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. तथापि, या यात्रोत्सवाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. दरम्यान, या उत्सवात देवस्थान श्री जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त देवीच्या गावाबाहेरील मंदिराचे प्रांगणात भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम ग्रामवासी व विश्वस्त मंडळाच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येतो. या महाप्रसादासाठी लागणारे गहू, ज्वारी, डाळ आदी धान्य गोळा करण्यासाठी वानखेड व दुर्गादैत्य या गावातून सजलेल्या बैलगाड्या वाजत गाजत फिरवून धान्य गोळा करण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे मंगळवारी ११ बैलगाड्या संपूर्ण गावातून फिरविण्यात आल्या व धान्य गोळा करण्यात आले. १३ जानेवारी रोजी दहिहांडी फोडण्यात येऊन भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
११ बैलगाड्यांद्वारे धान्य गोळा करण्याची शतकाची परंपरा आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी गाववासी तसेच मंडळाचे पदाधिकारी प्रयत्नरत आहेत.
- आनंदराव देशमुख
अध्यक्ष, श्री जगदंबा देवस्थान, वानखेड ता. संग्रामपूर