केशरी रेशन कार्डधारकांना १० जूनपासून सवलतीच्या दरात धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 10:52 AM2021-06-08T10:52:58+5:302021-06-08T10:53:03+5:30
Akola News : एक लाख सहा हजार ८१७ केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ मिळणार आहे.
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत एपीएल (केशरी) रेशन कार्डधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात १० जूनपासून केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार असून, जिल्ह्यातील एक लाख सहा हजार ८१७ केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ मिळणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत मे व जून या दोन महिन्यांत सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वितरण करण्यात येत आहे. यासोबतच एपीएल केशरी रेशन कार्डधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार केशरी रेशन कार्डधारकांना प्रतिव्यक्ती एक किलो गहू व एक किलो तांदूळ याप्रमाणे १२ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि ८ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ असे सवलतीच्या दराने धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील एक लाख सहा हजार ८१७ केशरी रेशनकार्डधारक लाभार्थींना सवलतीच्या दराने धान्याचे वितरण करण्यात येणार असून, १० जूनपासून जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दराने धान्य वितरित करण्याचे नियोजन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने केले आहे.
८१३३ क्विंटल धान्यसाठा उपलब्ध!
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी गतवर्षी ‘लाॅकडाऊन’च्या कालावधीत केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात आले होते. त्यासाठी मंजूर धान्यसाठ्यापैकी शिल्लक राहिलेल्या उपलब्ध धान्य साठ्यातून केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दराने धान्याचे वितरण करावयाचे आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दराने धान्य वितरित करण्यासाठी एक हजार २०८ क्विंटल गहू व सहा हजार ९२५ क्विंटल तांदूळ असा एकूण आठ हजार १३३ क्विंटल धान्यसाठा उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील एक लाख सहा हजार ८१७ केशरी रेशन कार्डधारकांना १० जूनपासून सवलतीच्या दराने धान्याचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. सवलतीच्या दरात धान्य वितरित करण्यासाठी सद्य:स्थितीत जिल्ह्यात आठ हजार १३३ क्विंटल धान्यसाठा उपलब्ध आहे.
- बी.यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला