जूनमध्ये धान्य, रॉकेल वाटप बंद ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 03:54 PM2020-05-25T15:54:30+5:302020-05-25T15:54:39+5:30
१ जूनपासून दुकानांतून धान्य वाटप बंद केले जाईल, तसेच केरोसिन विक्रीही बंद केली जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
अकोला : राज्यातील रास्त भाव दुकानदार, केरोसिन विक्रेत्यांच्या विविध मागण्या ३१ मे पर्यंत पूर्ण न झाल्यास येत्या १ जूनपासून दुकानांतून धान्य व केरोसिन वाटप बंद ठेवण्यात येत आहे, असे निवेदन राज्याच्या पुरवठा मंत्र्यांना विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसिन विक्रेता संघटनेने दिले आहे.
संघटनेने पाठवलेल्या निवेदनात दुकानदारांना तामिळनाडू सरकारप्रमाणे मानधन द्यावे, संपूर्ण राज्यात इ-पॉस मशिन योग्य चालत नाही. त्यामुळे धान्य वाटपात अडथळा येतो त्याचा शिधापत्रिकाधारक, दुकानदारांनाही त्रास होतो, तो थांबवण्यात यावा, ३१ मे पर्यंत दुकानदारांचा अंगठा लावून धान्य निघते, तशी सुविधा कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत द्यावी, राज्यात पाच दुकानदारांनाचा कोरोेनामुळे मृत्यू झाला आहे. तर अनेक आजारी आहेत. त्यामुळे राज्यातील दुकानदारांना ५० लाखांचे विमा कवच द्यावे, राज्यातील शिधापत्रिकाधारकांना प्रती कार्डवर २ लिटर केरोसिन द्यावे, गावगुंड, अतिउत्साही समाजसेवक यांच्याकडून दुकानदारांना होणारी मारहाण, खोट्या तक्रारी थांबवण्यात याव्या, या सर्व मागण्यांवर शासनाने ३१ मे पर्यत निर्णय घ्यावा, तो न झाल्यास १ जूनपासून दुकानांतून धान्य वाटप बंद केले जाईल, तसेच केरोसिन विक्रीही बंद केली जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. त्यावर विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसिन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, ज्येष्ठ उपाध्यक्ष शत्रुघ्न मुंडे, भगवंत राऊत, सचिव यादव पाटील, संजय देशमुख, सुरेश लालवाणी, ओमप्रकाश खानतराटे, कैलाश महाजन, राजेश कांबळे, पंडितराव देशमुख यांच्या स्वाक्षरी आहेत.