धान्य-डाळी, किराणा साहित्य भिजले; दुर्गंधी पसरली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:17 AM2021-07-25T04:17:20+5:302021-07-25T04:17:20+5:30
अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात अकोला शहरातील होलसेल किराणा व धान्य बाजारातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे दुकानांमधील ...
अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात अकोला शहरातील होलसेल किराणा व धान्य बाजारातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे दुकानांमधील धान्य, कडधान्य, डाळी आणि किराणा साहित्य भिजल्याने दुर्गंधी पसरली असून, दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बुधवार, २१ जुलै रोजी जिल्हयात रात्रभर मुसळधार पाऊस बरसला असून, अतिवृष्टी झाल्याने गुरुवार २२ जुलै रोजी जिल्हयातील नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयात शेती आणि पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्येच अकोला शहरातील गंगा नगर भागात होलसेल किराणा व धान्य बाजाराला अतिवृष्टीचा तडाखा बसला. होलसेल मार्केटमधील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानामधील धान्य, कडधान्य, विविध प्रकारच्या डाळींची पोती तसेच किराणा साहित्य पाण्यात भिजले. धान्य, डाळी आणि किराणा साहित्य भिजल्याने दुर्गंधी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या तडाख्यात होलसेल किराणा व धान्य बाजारातील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भिजलेले असे आहे धान्य,
डाळी आणि किराणा साहित्य!
पावसाचे पाणी दीड ते दोन फूट दुकानांमध्ये शिरल्याने, दुकानांमधील मूग, उडीद, हरभरा, तूर, मसूर, मठ, बरबटी, हरभरा इत्यादी प्रकारच्या डाळी तसेच काबुली हरभरा, वाटाणा, तांदूळ असे धान्य आणि खडीसाखर, चारोळी, काजू, सोयावडी, जिरे, खोबराखिस, हळद, चिंच, सोप आदी प्रकारचे किराणा साहित्य भिजले आहे. पाण्यात भिजलेल्या धान्य व साहित्याची दुर्गंधी पसरली आहे.
‘चारोळी’वर चढली बुरशी!
दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने धान्य, डाळी व विविध किराणा साहित्य पाण्यात भिजले. त्यामध्ये पाण्यात भिजलेल्या चारोळीचे खडे तयार झाले असून, त्यावर बुरशी पसरल्याचे चित्र एका दुकानात आढळून आले.
भिजलेल्या बरबटीला फुटले कोंब;
वाटाणा, हरभरा, मठाच्या घुगऱ्या!
अतिवृष्टीच्या तडाख्यात पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने कडधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामध्ये पाण्यात भिजलेल्या बरबटीला पोत्यातच कोंब फुटले असून, वाटाणा, हरभरा, मठ आदी कडधान्याच्या घुगऱ्या झाल्याचे वास्तव आहे.
नुकसानाचे पंचनामे सुरू!
अतिवृष्टीमुळे होलसेल किराणा व धान्य बाजारातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानाचे पंचनामे संबंधित तलाठी व कर्मचाऱ्यांमार्फत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत.