धान्य घोटाळा : गोदामपाल मेश्राम निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:35 AM2017-07-18T01:35:46+5:302017-07-18T01:35:46+5:30
अकोट येथील प्रकार : अपहारित धान्याची रक्कमही होणार वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोट शासकीय गोदामातील साठ्यामध्ये कमी आढळलेल्या गहू आणि तांदळासाठी जबाबदार धरून गोदामपाल मंगेश मेश्राम यांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी निलंबित केले. कमी आढळलेल्या धान्याचा अपहार समजून त्याची बाजारभावाने रक्कम वसुलीची कारवाईही केली जाणार असल्याची माहिती आहे. गोदामातील तपासणीत धान्यसाठा कमी असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते, हे विशेष.
जिल्ह्यातील सर्वच गोदामांतील धान्य साठा तपासण्याचे आदेश प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी बैठकीत शुक्रवारी दिले होते. त्यानुसार अकोटचे तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी अव्वल कारकून व्ही.डी. मोरे, कनिष्ठ लिपिक अविनाश जाधव यांच्यासह शनिवारी गोदामात धाव घेतली.
दिवसभर केलेल्या तपासणीत गोदामातील त्या दिवशीच्या साठा नोंदीनुसार पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये गव्हाचा साठा २,४६० क्विंटल असल्याची नोंद होती. तपासणीत गहू २,३२४ क्विंटल असून, त्यापैकी १३५.५ क्विंटल गहू कमी आहे. तर तांदळाचा साठा ३३५ क्विंटलपैकी २९१ क्विंटल असून, ४३ क्विंटल कमी असल्याचे आढळून आले. तहसीलदारांच्या पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल शनिवारी सायंकाळीच जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. पुढील कारवाईचा प्रस्ताव पुरवठा विभागाने सोमवारी सकाळीच सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमानुसार गोदामपाल मंगेश मेश्राम यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. निलंबन काळात मेश्राम यांचे मुख्यालय मूर्तिजापूर तहसील ठेवण्यात आले आहे.