धान्य दुकानदारांना माफिया, पोलिसांचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:43 AM2017-09-18T01:43:50+5:302017-09-18T01:43:59+5:30
तेल्हारा शहरातील शासकीय गोदामातून गावाकडे जाणारी धान्याची वाहने पोलिसांनी अडवून दुकानदारांना पैशांची मागणी करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले. या सततच्या त्रासाला कंटाळून तेल्हारा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यामध्ये वाहने अडविणारा पोलीस अधिकारी आणि धीरज चहाजगुणे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : तेल्हारा शहरातील शासकीय गोदामातून गावाकडे जाणारी धान्याची वाहने पोलिसांनी अडवून दुकानदारांना पैशांची मागणी करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले. या सततच्या त्रासाला कंटाळून तेल्हारा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली. त्यामध्ये वाहने अडविणारा पोलीस अधिकारी आणि धीरज चहाजगुणे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
तेल्हारा तालुक्यातील दुकानदारांची धान्याची उचल सुरू असताना त्यांची वाहने अडविण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले होते. त्यामध्ये बेलखेड येथील रमेश वसे, हिवरखेड येथील प्रकाश खोब्रागडे यांची वाहने अडविण्यात आली. या प्रकारांची माहिती दुकानदार संघटनेने निवेदनात दिली. त्यामध्ये ५ ऑगस्ट रोजी शासकीय गोदामातून हिवरखेड येथील दुकानाचे धान्य घेऊन जाणार्या ट्रॅक्टरसमोर गाडी लावून धीरज चहाजगुणे या व्यक्तीने अडविला. त्याचवेळी पोलिसांना फोन केला. ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष केदासे घटनास्थळावर हजर झाले. त्यांनी विचारणा केल्यावर दुकानदाराने त्यांना धान्याचे परमिट व गोदामाची गेटपास दाखविली. परमिटनुसार शासकीय धान्य असताना केदासे यांनी ट्रॅक्टर ठाण्यात लावला. त्याचवेळी धीरज चहाजगुणे याच्यामार्फत पैशांची मागणी केली. दुकानदाराने नकार दिल्यामुळे केदासे यांनी चिडून ट्रॅक्टरमधील धान्याचे वजन मोजण्यासाठी तब्बल दोन वेळा काट्यावर पाठविला. धान्याचे वजन बरोबर असतानाही सायंकाळी ५ वाजेपर्यंत ट्रॅक्टर सोडला नाही, त्यामुळे दुकानदार धास्तावले. धीरज चहाजगुणे आणि पोलिसांच्या या सततच्या त्रासाला दुकानदार कंटाळले. तेल्हारा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार खारोडे, भोजराज पालिवाल, राजपालसिंह ठाकूर, प्रकाश वाकोडे, जगन्नाथ दुतोंडे, शिवहरी मिरगे, दिनेश यादगिरे, प्रकाश खोब्रागडे यांनी त्या प्रकाराबद्दल जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे निवेदन सादर केले. पोलीस आणि चहाजगुणे यांच्या त्रासापासून वाचविण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली.
जिल्हा पुरवठा अधिकार्यांचे ‘एसपीं’ना पत्र
शासकीय धान्य वाहतुकीदरम्यान संबंधित दुकानदाराने परमिट आणि गेटपास दाखविली. त्यानंतर समाधान न झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक संतोष मंदासे यांनी धान्याचे दोनदा वजन करण्यासाठी पाठविले. सर्व माहिती बरोबर असतानाही सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहन पोलीस ठाण्यात ठेवले. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, असे पत्र जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांना १५ सप्टेंबर रोजी पाठविले आहे.
तांदळाचा ट्रक गायब करणारा माफिया मोकाट
जानेवारी २0१५ मध्ये तेल्हारा तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी असलेला दोनशे क्विंटल तांदळाचा ट्रक खुल्या बाजारात विकणारा रेशन माफिया कोण आहे, याची माहिती पोलिसांना आहे. त्या माफियांवर कारवाई न करणारे पोलीस दुकानदारांना नियमानुसार धान्य वाहतुकीसाठी त्रास देत आहेत. वरिष्ठांनी त्या माफियाची माहिती घेऊन त्याच्यासह पोलिसांवर कारवाई न केल्यास असे प्रकार यापुढेही सुरूच राहण्याची शक्यता आहे.