Gram Panchayat Election : तीन दिवसांच्या सुटीनंतर आज दाखल होणार उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 11:06 AM2020-12-28T11:06:36+5:302020-12-28T11:11:18+5:30
Gram Panchayat Election : जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची गर्दी होणार आहे.
अकोला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. त्यानुषंगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची गर्दी होणार आहे.
एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. दरम्यान, २५, २६ व २७ डिसेंबर रोजी सलग तीन दिवस सार्वजनिक सुटी असल्याने, या तीन दिवसांच्या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बंद होती. तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी (दि. २८) जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता तीन दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे तीन दिवसांच्या सुटीनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये उमेदवारांची गर्दी होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आज बैठक!
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी (दि.२८) दुपारी ३.३० वाजता अकोला तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे, असे अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी सांगितले.