Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत अविराेधवर भर, महाआघाडी नाहीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 10:26 AM2020-12-22T10:26:26+5:302020-12-22T10:28:34+5:30
Gram Panchayat Election:राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूक अविराेध करण्यासाठीच प्रयत्न सुरू केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ लाख ८६ हजार २९१ मतदार ग्रामपंचायतींची सत्ता ठरविणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले. असले तरी राज्यातील महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यत नाहीच उलट राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूक अविराेध करण्यासाठीच प्रयत्न सुरू केले आहेत.
ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तसेच पॅनल गठीत करून ग्रामपंचायतींमध्ये सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले सदस्यांचे संख्याबळ मिळविण्यासाठी गावागावांत गाव पुढाऱ्यांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मात्र यामध्ये राजकीय पक्षापेक्षा व्यक्तीचे वैयक्तिक संबंधांना जास्त महत्त्व असते राजकीय नेत्यांना आपले पाठीराखे सांभाळायचे असल्याने महाआघाडी केली तर उमेदवारी देण्याबाबत मर्यादा येणे स्वाभाविकच आहे. अशा स्थितीत स्वंतत्र लढणे किंवा अविराेध निवडणूक पार पाडण्याकडेच राजकीय नेत्यांचा कल आहे. वंचित बहुजन आघाडी, भाजप, शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस अशा विविध पक्षांतील कार्यकर्ते व नेते यांचे एकत्रित पॅनल हेच यावेळीही ग्रामपंंचायतीचे चित्र असेल.
स्थानिक संस्थांमध्ये ‘वंचित’चा दबदबा
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा दबदबा आहे पंचायत समितीसह जिल्ह्यातील माेठ्या ग्रामपंचायतींवर वंचितचा झेडा आहे त्यामुळे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे माेठे आव्हान इतर पक्षांसमाेर उभे ठाकणार आहे. त्या दुष्टीने इतर पक्षांना तयारी करावी लागणार आहे.
तिन्ही पक्ष एकत्र नाहीच
महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र लढतील अशी चर्चा हाेती प्रत्यक्षात मात्र हे तिन्ही वेगवेगळेच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत स्वतंत्र लढण्याचा पर्याय आहे.
लढल्यास काय परिणाम?
महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे ग्रामीण भागात चांगलेच वर्चस्व आहे. हे पक्ष एकत्र लढले, तर मतविभाजन टाळता येईल व ग्रामपंचयातवर ताबा मिळवणे शक्य हाेईल, मात्र उपलब्ध जागा आणी इच्छुकांची संख्या लक्षात घेता एकत्र लढले जाणार नाही त्यामुळे साहजिकच नेत्यांची अडचण हाेणार आहे.
ग्रा.पं. निवडणुकीत अविराेधाला बक्षीस
ग्रामपंचायत निवडणुक अविराेध केल्यास आमदारांनी ग्रामपंचायतीस विशेष निधी देण्याची घाेषणा केल्या आहेत. आमदार नितीन देशमुख यांनी ग्रामपंचायतच्या सदस्य संख्येच्या तुलनेत निधीची तरतूद केली जाईल असे जाहीर केल्याने ‘अविराेधाला बक्षीस’ असा नवा पायंडा या निवडणुकीत पडत आहे.