पाणी पुरवठा योजनेचा निधी ग्रामपंचायतने हडपला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:00 PM2019-01-30T13:00:08+5:302019-01-30T13:00:25+5:30
अकोला: राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून मंजूर पाणी पुरवठा योजनेसाठीचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात आल्यानंतर तो ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला न देताच हडप करण्याचा प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी ग्रामपंचायतमध्ये घडला आहे
अकोला: राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून मंजूर पाणी पुरवठा योजनेसाठीचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात आल्यानंतर तो ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला न देताच हडप करण्याचा प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी ग्रामपंचायतमध्ये घडला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने सातत्याने पत्र दिल्यानंतरही निधी मिळत नसल्याने अखेर गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देत कारवाई करण्याचे बजावले आहे.
मधापुरी येथील नळ पाणी पुरवठा योजना ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडून राबविण्यात आली. योजनेचे कामही पूर्ण झाले. अंतिम मूल्यांकनानुसार २ लाख २४ हजार रुपये ६९३ रुपयांची मागणी आली. त्यानुसार ग्रामपंचायत मधापुरीच्या खात्यावर ही रक्कम २५ मे २०१७ रोजीच हस्तांतरित करण्यात आली. नियमानुसार ग्रामपंचायतने सात दिवसांत पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला रक्कम देणे बंधनकारक होते. तेव्हापासून अद्यापही ती रक्कम ग्रामपंचायतीकडून समितीच्या खात्यावर देण्यात आलेली नाही. त्यामुळे समितीने थेट जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे धाव घेतली. त्यावर विभागाने पत्र दिले. त्या पत्रालाही ग्रामपंचायतने दाद दिली नाही. ग्रामपंचायतकडून टाळाटाळ सुरू असल्याने पाणी पुरवठा विभागाने अखेर मूर्तिजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना पत्र देत ही रक्कम हस्तांतरित करण्यासाठी कारवाई करण्याचे बजावले आहे.