ग्रामपंचायत, आरोग्य केंद्राची झाडाझडती
By admin | Published: June 3, 2017 02:05 AM2017-06-03T02:05:10+5:302017-06-03T02:05:10+5:30
गोरेगाव खुर्द : आरोग्य सेविकेची केली कानउघाडणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव खुर्द : अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समितीने शुक्रवारी गोरेगाव खुर्द येथे अचानक भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची झाडाझडती घेतली. यावेळी आरोग्य उपकेंद्रात २००९ चा व अल्प औषधसाठा आढळल्याने समितीने आरोग्य सेविकेला धारेवर धरले.
पंचायत राज समितीचे अध्यक्ष प्रकाश भारसाकळे व सदस्य अमित झनक यांच्या पथकाने गोरेगाव ग्रामपंचायतमध्ये अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामसेवक झोपे यांच्याकडून प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती घेतली. तसेच सरपंच स्मिता वाकोडे व उपसरपंच प्रशांत तायडे यांना शौचालयासंदर्भात विचारणा केली. त्यांना समाधानकारक उत्तर मिळाल्याबद्दल अध्यक्ष भारसाकळे यांनी व झनक यांनी गोरेगाव खुर्द ग्रामपंचायतीचा चांगला कारभार असल्याचे सांगितले. पथकाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांची पाहणी केली, तसेच लाभार्थ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी ग्रामरोजगार सेवक कुंदन रमेश तायडे, ग्रामसेवक पंकज झोपे, सरपंच स्मिता वाकोडे, प्रशांत तायडे, विवेक डंबाळे, गजानन तायडे, सतीश वास्कर व सर्व गावकरी यांच्याबरोबर जाऊन आमदार अमित झनक, जि. प. सदस्य संतोष वाकोडे पथकाबरोबर होते. पथकाने प्राथमिक उपकेंद्राला भेट दिली.
यावेळी पथकाने विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे झनक यांनी उपकेंद्राची तपासणी केली. त्यामध्ये त्यांना २००९ चा औषधाचा साठा मिळाला व औषधेही खूप कमी प्रमाणात मिळाले. समितीने उपकेंद्रातील आरोग्य सेविका सलोनी पोटे आणि आरोग्य सेवक ताजने यांना चांगलेच धारेवर धरले. गोरेगाव खुर्दला पथकाने प्रथमच भेट दिली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी पथकाची कारवाई पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
तेल्हाऱ्यात उपोषणकर्त्यांची घेतली भेट
गत २५ वर्षांपासून शासकीय जागेवर वास्तव्य करणाऱ्या तालुक्यातील नागरिकांकडे जागेची मालकी नसल्याने पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत नसून, सदर जागेची नोंद ही त्यांच्या नावाने व्हावी, याकरिता रिपाइं (आठवले गटाचे) तालुकाध्यक्ष जे. पी. सावंग यांच्यासह तालुका सरचिटणीस विनायक वानखडे, निरंजन इंगळे, साहेबराव तायडे, सिद्धार्थ बोदडे, दादाराव वानखडे, श्रावण वानखडे आदींनी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले होते. सदर उपोषणास पीआरसीने भेट देऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सुटले.
पदाचा दुरुपयोग; फौजदारी दाखल करा
भांबेरी: विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवल्यावरही घरकुल व प्रमाणपत्रांवर स्वाक्षरी करणाऱ्या सरपंच व उपसरपंचावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश पीआरसीने गटविकास अधिकाऱ्यांना दिले. भांबेरी येथे पीआरसीच्या पथकाने शुक्रवारी अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी केलेले अतिक्रमण व अंगणवाडीतीले अवस्था पाहता पथकाने मुख्याध्यापकांना धारेवर धरले. यावेळी अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या कारभाराच्या तक्रारी केल्या. यावेळी पथकाने विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर ग्राम विकास अधिकाऱ्याला देता आले नाही.