बळजबरीने मतदान करून घेतल्याची ग्रामपंचायत सदस्याची तक्रार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:19 AM2021-04-09T04:19:33+5:302021-04-09T04:19:33+5:30
मकमपूर ग्रामपंचायत निवडणुकीत सात सदस्य निवडून आले आहेत. सरपंच पदाकरीता संतोष हिवरे व भाग्यश्री लोणकर उमेदवार होते. सरपंच ...
मकमपूर ग्रामपंचायत निवडणुकीत सात सदस्य निवडून आले आहेत. सरपंच पदाकरीता संतोष हिवरे व भाग्यश्री लोणकर उमेदवार होते. सरपंच पदाची निवडणूक जिंकण्यासाठी चार सदस्य आवश्यक होते. सरपंच पदाच्या निवडणुकीत निवडुन आलेल्या सर्व सदस्यांना मतदान गोपनीय पध्दतीने करणे आवश्यक होते. परंतु नवनिर्वाचित सदस्य अजय नारायण कुमरे
मतदान करीत असताना, सरपंच पदाचे उमेदवार संतोष श्रीराम हिवरे यांनी बळजबरीने त्यांचा हात धरून त्यांच्या चिन्हावर शिक्का/खुण मारल्याची तक्रार अजय कुमरे यांनी केली. यावेळी निवडणुक बुथवर हजर असलेले निवडणुक अधिकारी, ग्रामसेवक यांनी नवनिर्वाचीत सदस्य भाग्यश्री संतोष लोणकर, शिवदास देविदास आगलावे, रूपाली पुरूषोत्तम मंडलवार व ग्रामस्थांसमक्ष हरकत नोंदवून घेतली नाही. संतोष श्रीराम हिवरे यांना
सरपंच म्हणून घोषित केले. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रियाने कायदेशिर व नैसर्गिक हक्कास बाधा पोहोचविणारी आहे. कायद्याचा व निवडणूक नियमांचा भंग झाला आहे. त्यामुळे दोषींविरूध्द कायदेशीर कारवाई करून सरपंच पदाची निवडणुक रद्द करून पुन्हा निवडणुक घेण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली. दरम्यान या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी अकोला यांना अहवाल सादर करायचा असल्याने, निवडणूक अध्यासी अधिकारी व्ही. एल. थुल यांना तक्रार अर्जानुसार नमुद केलेल्या मुद्यांवर स्वयंस्पष्ट अभिप्राय ९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अकोट तहसीलदारांनी मागविला आहे. निवडणूकी दरम्यान गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबधित दोषींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. चार नवनिर्वाचित सदस्यांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी केली. तसेच निवडणूक न घेतल्यास उपोषणाला बसण्याची व न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.