जन्म, मृत्यू, विवाहप्रसंगी ग्रामपंचायत देणार रोपांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:46 PM2018-03-19T13:46:18+5:302018-03-19T13:46:18+5:30
अकोला: वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’ निर्मितीवर भर देण्याची तयारी सुरू केली आहे.
अकोला: वर्तमानासोबतच येत्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी ग्रामविकास विभागाने ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’ निर्मितीवर भर देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत गावातील बालकांचा जन्म, विवाह, परिक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी, मृत्यूप्रसंगी रोप भेट देण्याचा उपक्रम चालू वर्षात राबवला जाणार आहे. त्या रोपांची संगोपन करण्याची जबाबदारीही संबंधितांना दिली जाणार आहे.
‘वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना’ हा उपक्रम ग्रामपंचायतीमार्फत येत्या वर्षात राबवला जाणार आहे. त्यासाठी रोपांची उपलब्धता करून घेण्याचे ग्रामविकास विभागाने बजावले आहे.
येत्या काळात जागतिक वातावरणीय बदलामुळे कमालपेक्षा किमान तापमानामध्ये मोठी वाढ होणार आहे. त्याचा परिणाम पर्जन्यमान, उष्णता व आर्द्रतेवर होणार आहे. वातावरणात होणाºया बदलातही मानवी जीवन, पिके, पर्यावरणातील घटकांनी तग धरावी, यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याचे आव्हान शासनापुढे आहे. त्या वातावरणीय बदलास पूरक ठरणाºया गावांची निर्मितीचा प्रयत्न शासनाला करावा लागत आहे. त्यामध्ये गावपातळीवर लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम राबवणे, जलसंधारण, डोंगर दत्तक घेणे, नदी दत्तक घेणे, गावतळे, गावाची वनराई योजनांचा विकास करणे, गावनिहाय सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आधारित स्वतंत्र ग्रिड तयार करून ऊर्जा निर्भर गावांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी महत्त्वाची असलेल्या वृक्षलागवडीची जबाबदारी ग्रामपंचायतीवर देण्यात आली. त्यासाठी येत्या वर्षभरात गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. प्रत्येक कुटुंबाकडून रोपांची लागवड व्हावी, त्याचे संगोपन व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीकडून रोपे देण्याची तयारी आहे.
- माहेरची झाडी, स्मृती वृक्षही लावणार
ग्रामपंचायतीला ठरवून दिल्याप्रमाणे गावात या वर्षात जन्माला आलेल्या बालकांचे स्वागत फळझाडाच्या रूपात शुभेच्छा वृक्ष देऊन केले जाईल. तसेच कुटुंबीयांना बाळाप्रमाणे संवर्धन करण्याची गळ घातली जाईल. गावातील तरुणांच्या विवाहप्रसंगी शुभमंगल वृक्ष, तसेच मुलींच्या विवाहप्रसंगी माहेरची झाडी म्हणून रोप दिली जातील. शालेय परीक्षा उत्तीर्ण होणारे, नोकरी मिळणारे, निवडणुकीत विजयी होणाºया उमेदवारांनाही आनंदवृक्ष म्हणून रोप दिले जातील. गावात निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी फळझाडाचे रोप देऊन श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
ग्रामपंचायत करणार रोपांचा खर्च
रोप उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतींनी स्वउत्पन्नातून खर्च करावयाचा आहे. त्याशिवाय पर्यावरण प्रेमी, दानशूर व्यक्ती, सामाजिक दायित्व निधीही खर्च होणार आहे.
१ जुलै रोजी होणार वाटप
गेल्या वर्षभरात म्हणजे, १ जुलै ते ३० जून दरम्यानच्या काळातील सर्वच घटना, प्रसंगांची माहिती घेत किती रोपांची गरज आहे, त्यानुसार रोपे मागवावी, त्या रोपांचे वाटप १ जुलै रोजी एकाच दिवशी केले जाईल. रोपांचे वाटप करण्यापूर्वी गावात वृक्षदिंडी काढली जाईल. विशेष म्हणजे, वाटप केलेल्या रोपांची नोंद ग्रामपंचायतींच्या नोंदवहीत होणार आहे.