‘कोरोना’ सावटात अडकली ग्रामपंचायतची दप्तर तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:23 AM2020-08-31T10:23:02+5:302020-08-31T10:23:26+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या सावटात विभागातील पाचही जिल्ह्यांत ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी अडकली आहे.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणारी ग्रामपंचातींची अभिलेखे (दप्तर) तपासणीची मोहीम स्थगित करून, १ डिसेंबरपासून ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी सुरू करण्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी विभागातील पाचही जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) २५ आॅगस्ट रोजी दिला. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाच्या सावटात विभागातील पाचही जिल्ह्यांत ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी अडकली आहे.
ग्रामपंचायत स्तरावर असलेली सर्व प्रकारची अभिलेखे अद्ययावत नसल्यामुळे संबंधित माहितीच्या दृष्टीने प्रशासनाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतींची अभिलेखे (दप्तर) अद्ययावत करण्यासाठी अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या पाचही जिल्ह्यांतील
ग्रामपंचायतींच्या गत पाच वर्षातील दप्तर तपासणी १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत करण्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी १० आॅगस्ट रोजी विभागातील पाचही जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या पाच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी सुरू करण्याचा आदेश पंचायत समितींच्या गटविकास अधिकाºयांना देण्यात आला होता. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामात राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी व्यस्त असून, अनेक ग्रामसेवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीस तूर्त स्थगिती देण्याची मागणी महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनकडून विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार विभागातील पाचही जिल्ह्यात १५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणारी ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीची मोहीम स्थगित करून, १ डिसेंबरपासून ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणीची मोहीम राबविण्याचा आदेश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी विभागातील पाचही जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना २५ आॅगस्ट रोजी दिला. त्यामुळे कारोना संकटाच्या काळात विभागातील पाचही जिल्ह्यात ग्रामपंचायतींची दप्तर तपासणीही लांबणीवर पडली आहे.
३० नोव्हेंबरपर्यंत अभिलेखे अद्ययावत करण्याचे निर्देश!
१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ग्रामपंचायतींची गत पाच वर्षांतील सर्व अभिलेखे (दप्तर)अद्ययावत करून, त्यानंतर १ डिसेंबरपासून ग्रामपंचायतींची दप्तर तपासणीची मोहीम सुरू करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी विभागातील पाचही जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत.