पारदर्शितेसाठी ग्रामसभांचे राज्यात प्रथमच थेट प्रक्षेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 01:12 PM2019-06-23T13:12:37+5:302019-06-23T13:17:07+5:30
एकाच दिवशी ग्रामसभा घेत त्यामध्ये पारदर्शिता ठेवण्यासाठी त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचा राज्यातील पहिला उपक्रम अकोला जिल्हा परिषदेने शनिवारी राबविला.
अकोला : ग्रामीण भागातील विकास योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ग्रामसभा घेत त्यामध्ये पारदर्शिता ठेवण्यासाठी त्याचे थेट प्रक्षेपण करण्याचा राज्यातील पहिला उपक्रम अकोला जिल्हा परिषदेने शनिवारी राबविला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील ५२६ पैकी २५२ ग्रामपंचायतींच्या सभांचे थेट प्रक्षेपण झाले. तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, पोटनिवडणुकीमुळे ग्रामसभा झाल्या नाहीत. तेथे २५ जून रोजी सभा होणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी २२ जून रोजी विशेष ग्रामसभा घेऊन विविध विषयांचे ठरावही घेण्याचे पत्र सरपंच, सचिवांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक गावातील ग्रामसभेसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली. गावांमध्ये एकाच वेळी झालेल्या ग्रामसभांमध्ये प्रधानमंत्र्यांच्या पत्राचे वाचन करण्यात आले. त्याशिवाय, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ठरवून दिलेल्या नियोजनाच्या पत्रानुसार आयुष्यमान भारत योजनेची लाभार्थी यादी वाचन, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी ‘सेल्फ’ तयार करणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वाढीव कुटुंबांची यादी तयार करणे, जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाºया सर्व योजनांची माहिती देणे, रमाई घरकुलासाठी लाभार्थी निवड करणे, पाण्याचे महत्त्व पटवून देणे, पाणी संवर्धनासाठी श्रमदान करावे, त्यामध्ये ग्रामस्थांना सहभागी करून घेण्यात आले. ज्या तहकूब झालेल्या ग्रामपंचायतींच्या सभांमध्ये सर्व विषयाचे वाचन व माहिती देण्यात आली. लाभार्थी निवड करण्यात आली नाही. तसेच आॅफलाइन चित्रीकरण केलेल्या ग्रामपंचायतीचे व्हिडिओ युट्युबवर अपलोड केले जाणार आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या हरिभाऊ वाघोडे यांनी अकोला तालुक्यातील ग्रामपंचायत वाशिंबा येथे ग्रामसभेत मार्गदर्शन केले.
- पहिल्याच टप्प्यात २५२ ग्रामपंचायतींचे प्रक्षेपण
अकोला तालुक्यातील ९७ पैकी ९० ग्रामपंचायतींमध्ये सभा झाली. त्यापैकी सात ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक आहे. १२ सभा तहकूब झाल्या. ५१ ग्रामसभांचे थेट प्रक्षेपण झाले. अकोट तालुका - ८५ पैकी ४९ प्रक्षेपण, बाळापूर तालुका - ६६ पैकी ४६ ग्रामसभांचे प्रक्षेपण, बार्शीटाकळी - ८० पैकी ३७ ग्रामपंचायतींचे थेट प्रक्षेपण, पातूर तालुका- ५७ पैकी २३ प्रक्षेपण, मूर्तिजापूर तालुका- ८६ पैकी २६ प्रक्षेपण, तेल्हारा तालुक्यात सभा सुरू होत्या.