हरभरा पेरणी तंत्रज्ञानाचे धडे थेट शेतावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 03:36 PM2018-11-06T15:36:56+5:302018-11-06T15:45:54+5:30
एकात्मिक पीक व्यवस्थापन, कमी खर्चात अधिक उत्पादन तंत्रज्ञान प्रसारासाठी हरभरा पीक पेरणीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना थेट शेतावर जावून समजावून सांगितले जात आहे.
अकोला : एकात्मिक पीक व्यवस्थापन, कमी खर्चात अधिक उत्पादन तंत्रज्ञान प्रसारासाठी हरभरा पीक पेरणीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना थेट शेतावर जावून समजावून सांगितले जात आहे. शासनाच्या (आरकेव्हीवाय)राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार,शिक्षण संचालनालयामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आरकेव्हीवायतंर्गत एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित केले आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या या तंत्रज्ञान प्रकल्पाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत कृषी विद्यापीठाला अनुदान उपलब्ध करू न देण्यात आाले आहे. याच अनुषंगाने या रब्बी हंगामात हरभरा पिकावर कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रीत केले असून,अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार तर मूतीजापूर तालुक्यातील दुर्गवाडा गावाची निवड करू न या प्रकल्पाची सुरू वात केली आहे.या तंत्रज्ञानातंर्गत शेतकऱ्यांना हरभरा लागवडीची इंत्यभूत शास्त्रीय माहिती देताना मंगळवारी हरभरा बियाणेपासून ते जैविक बुरशीनाशके, पुरवठा करण्यात आला.
खरीप हंगामानंतर विदर्भात हरभरा पेरणी मोठ्याप्रमाणात केली जाते. सोयाबीन काढल्यानंतर त्या ठिकाणी शेतकरी इतर रब्बी पिकांऐवजी हरभराच पेरणी केली जात असल्याने या पिकाकडे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रीत केले आहे.
कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा चांगला फायदा होत असून, उत्पादन वाढण्यात मदत होते.याच अनुषंगाने विदर्भातील ११ जिल्ह्यात या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शेतावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- डॉ. दिलीप मानकर, संचालक विस्तार शिक्षण, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.