कवठा येथे ग्रामसेवकावर हल्ला
By Admin | Published: January 10, 2017 02:33 AM2017-01-10T02:33:42+5:302017-01-10T02:33:42+5:30
शौचालय असल्याचे बनावट प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने ग्रामसेवकावर हल्ला.
उरळ (अकोला), दि. ९- शौचालय असल्याचे बनावट प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने ग्रामसेवकावर हल्ला केल्याची घटना कवठा ग्रामपंचायतमध्ये ९ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कवठा येथील ग्रामसेवक शशिकांत श्रीधरराव इंगळे हे ९ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत होते. दरम्यान, तेथे गावातील सागर विजय घ्यारे हा युवक आला. त्याने ग्रामसेवक इंगळे यांना शौचालय नसताना असल्याचे प्रमाणपत्र मागितले. इंगळे यांनी नकार दिला असता घ्यारे याने ग्रामपंचायत कार्यालयात असलेला सौर ऊर्जा दिव्याच्या पाइपने त्यांच्यावर वार केला. इंगळे यांनी तो वार चुकवला. त्यानंतर घ्यारे याने इंगळेंना मारहाण केली तसेच अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शशिकांत इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी सागर घ्यारे विरुद्ध कलम ३५३, ३३२, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घ्यारे यास अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात पोकॉ संतोष सोळंके व संतोष मेहंगे करीत आहेत.